भूकंपाबरोबर सुरुंगस्फोटानेही हादरतोय तलासरी तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:19 PM2019-12-26T23:19:37+5:302019-12-26T23:20:13+5:30
उधवा-करजगावातील ग्रामस्थ हैराण : कारवाई कधी होणार?
सुरेश काटे
तलासरी : तलासरी भागात वैधबरोबर अवैध खदानी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या खदानींमध्ये अवैधरीत्या सुरुंगाचे स्फोट करून मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन केले जाते. या वेळी केल्या जात असलेल्या स्फोटांमुळे आजूबाजूचा परिसर हादरत आहे. घरांना तडे जात आहेत. पाण्याची पातळीही खोल जात आहे. मात्र हे सुरुंग स्फोट काही थांबत नाही. आधीच सततच्या भूकंपांमुळे त्रस्त असलेले ग्रामस्थ खदानींमधील स्फोटांमुळे हैराण झालेले असून एखादी भीषण दुर्घटना घडल्यानंतरच शासकीय यंत्रणा कारवाई करणार का, असा प्रश्न स्थानिक विचारीत आहे.
तलासरी भाग सध्या निसर्गनिर्मित भूकंपांच्या धक्क्यांनी हादरत असून दुसरीकडे खदानीतही स्फोटांची मालिका सुरूच आहे. तलासरी भागात खदानींना सुरुंग स्फोट करून दगड उत्खनन करण्याची परवानगी नसल्याचे तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी स्पष्ट केले असताना खदानीत सुरुंगाचे स्फोट होतात कसे? महसूल विभागाचे मंडळ अधिकार, तलाठी गस्त घालत असताना या गोष्टी त्यांच्या निदर्शनात येत नाहीत का? असेही सवाल स्थानिक करीत आहेत.
या खदानी मालकांच्या मनमानी सुरुंग स्फोटाचा फटका उधवा तसेच करजगाव येथील नागरिकांना बसत आहे. उधवा येथील खदानीमुळे सुरतीपाडा व कलमदेवी येथील नागरिक हैराण आहेत. कलमदेवी येथील ग्रामपंचायतीने याबाबतचा कारवाईसाठी ग्रामसभेचा ठरावही करून पाठवला. पण कारवाई शून्य, सुरतीपाड्यातील नागरिकांनी तलासरी तहसीलदारांना तक्रार अर्ज दिला आहे.
महसूल विभाग कारवाई करीत नसल्याने उधवा करजगावमधील खदानीमधील स्फोटांचे प्रमाण वाढले आहे. भूकंपामुळे घरांचे नुकसान होत आहे.
स्फोटांमुळे डोकेदुखी झोपायचे तरी कुठे?
खदानीत होणाऱ्या स्फोटांमुळे येथील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. घरात झोपावे तर भूकंपाची भीती अन् बाहेर बसावे तर खदानीतील दगडाची भीती सतावत आहे. त्यामुळे नागरिकांनी करावे तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. खदानीत स्फोट करणारे लोक राजस्थानातील असून स्फोट करण्याचे परवाने त्यांच्याकडे आहेत. पण तलासरीत स्फोटाची परवानगी नसताना मनमानी पद्धतीने खदानीत सुरु ंग स्फोट केले
जात आहेत.