तलासरी तालुक्यात मागेल त्याला रोजगार हमीचे काम; १२२ कामे सुरू, ६४७ मजुरांना राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:46 AM2021-03-25T00:46:58+5:302021-03-25T00:47:06+5:30
वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरणामार्फत पाच कामे रोपवाटिका व वृक्षलागवडीची सुरू आहेत. त्यावर ११ मजूर कामाला आहेत. तलासरी पंचायत समितीमार्फत रोजगार हमीतून घरकुलांची सर्वाधिक १०४ कामे सुरू आहेत.
तलासरी : तलासरीत रोजगार हमीची कामे मोठ्या संख्येने सुरू असून प्रत्येक गावपाड्यांत मागेल त्याला रोजगार हमीचे काम तत्काळ दिले जात असून, एकूण यंत्रणेच्या १२२ कामांमध्ये ६४७ मजुरांच्या हाताला काम दिले असल्याने लाॅकडाऊननंतर काम नसलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
रोजगार हमीच्या कामांमुळे या भागातून होणारे स्थलांतर काही अंशी कमी झाले आहे. तलासरी तालुक्यात कृषी विभागामार्फत फळबाग लागवड, मजगी, जुनी भातशेती दुरुस्ती इत्यादींची सहा कामे सुरू असून १२५ मजूर काम करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची रोजगार हमीची रस्ते, मोरी, साकव अशा चार कामांवर १२४ मजूर कामाला आहेत. वनविभाग बोर्डीच्या अखत्यारीत रोपवाटिका, जलशोषक चर अशी दाेन कामे असून तेथे ४ मजूर कामावर आहेत. उधवा वन विभागामार्फत फक्त एकच काम रोपवाटिकेचे सुरू आहे. त्यावर २८ मजूर काम करीत आहेत.
वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरणामार्फत पाच कामे रोपवाटिका व वृक्षलागवडीची सुरू आहेत. त्यावर ११ मजूर कामाला आहेत. तलासरी पंचायत समितीमार्फत रोजगार हमीतून घरकुलांची सर्वाधिक १०४ कामे सुरू आहेत. त्यावर ३५५ मजूर काम करीत आहेत.
अशी एकूण १२२ कामे सुरू असून त्यामध्ये ६४७ मजुरांच्या हाताला काम देण्यात आले आहे.
उद्दिष्टापेक्षा जास्त कामे
तलासरी तालुक्याला एक लाख ९९० मजूर दिवस हे उद्दिष्ट देण्यात आले होते. पण, तलासरी तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करून उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले. त्यांनी एक लाख ३८ हजार १७५ दिवस मजुरांना काम दिले. त्याची टक्केवारी १३५.४९ टक्के झाली. तलासरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमीची कामे सुरू आहेत. मागेल त्याला तत्काळ काम देण्यात येईल, असे तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांनी सांगितले