तलासरी - डहाणू तालुका भूकंपग्रस्त घोषित करावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 01:26 AM2019-11-25T01:26:41+5:302019-11-25T01:27:25+5:30

डहाणू तालुक्यात भूकंप सत्र अजून सुरूच आहे. गेल्या दीड वर्षांपासून हजारो सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के या परिसरात बसत आहेत.

Talasri - Dahanu taluka should be declared earthquake affected | तलासरी - डहाणू तालुका भूकंपग्रस्त घोषित करावा

तलासरी - डहाणू तालुका भूकंपग्रस्त घोषित करावा

Next

तलासरी/कासा : डहाणू तालुक्यात भूकंप सत्र अजून सुरूच आहे. गेल्या दीड वर्षांपासून हजारो सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के या परिसरात बसत आहेत. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील गावे गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली. यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

तालुक्यात बुधवारी आठ आणि गुरूवारी पहाटेपासून एकपाठोपाठ एक असे सौम्य, मध्यम भूकंपाचे धक्के बसले. मात्र यातील ७ वाजून २० मिनिटांनी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर सोमवारीही मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांनी ३.९ रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का बसला होता. त्याची तीव्रता जास्त होती. त्यामुळे तलासरी, डहाणू, धुंदलवाडी, दापचरी, वंकास, झाई, बोर्डी, उधवा, कासा, तसेच गुजरात राज्याचा उंबरगाव, भिल्लाड, सिल्वासपर्यंत धक्का बसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

सातत्याने होणाऱ्या भूकंपाने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण वाढतच आहे. येथील काही घरे साधी आणि कमी क्षमता असलेली आहेत. वारंवार होणाºया भूकंपाने अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. या भूकंपाने घर कोसळले तर जायचे तरी कुठे असा प्रश्न नागरिक करीत आहेत. दररोजचा भूकंप व अति पाऊस झाल्याने वाया गेलेले पीक यामुळे ओला दुष्काळ निर्माण झाला असून येथील स्थलांतर आता वाढणार आहे. वारंवार होणा-या भूकंपाने हैराण झालेल्या नागरिकांनी आता डहाणू आणि तलासरी तालुका भूकंपग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली आहे.
 

Web Title: Talasri - Dahanu taluka should be declared earthquake affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.