तलाठी आंदोलनामुळे दाखले मिळेना, हजारो लाभार्थी योजनांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:02 AM2017-10-26T03:02:36+5:302017-10-26T03:02:39+5:30
वसई : तलाठ्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि कोर्टाकडून बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसांमुळे राज्यभरात तलाठ्यांनी उत्पन्नाचे आणि नॉनक्रिमिलेयरचे दाखले देणे बंद केले आहे.
शशी करपे
वसई : तलाठ्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि कोर्टाकडून बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसांमुळे राज्यभरात तलाठ्यांनी उत्पन्नाचे आणि नॉनक्रिमिलेयरचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे तहसिल कचेरीतून दाखले मिळेनासे झाले आहेत.
तलाठ्यांनी पंचनामा करून दाखला दिल्यानंतर तहसिल कचेरीतून विविध प्रकारचे दाखले मिळतात. त्यात उत्पन्नाचा आणि नॉन क्रिमिलेयरचा दाखला महत्वाचा आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी उत्पन्नाचे खोटे दाखले दिल्याचे कारण दाखवून तलाठ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर वाशी येथील दिवाणी न्यायालयाने तलाठ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यानंतर राज्यभरातील तलाठ्यांनी दाखल्यांसाठी कोणत्याही प्रकारचे पंचनामे आणि प्रमाणपत्र देण्याचे काम २ आॅक्टोबर २०१७ पासून बंद ठेवले आहे. परिणामी राज्यभरात हजारो लोकांना त्याचा फटका बसला आहे. एकट्या वसईत सध्या दररोज शेकडो लोक दाखल्यांसाठी तहसिल कचेरीत फेºया मारीत आहेत. पण, तलाठ्यांच्या पंचनाम्याशिवाय दाखला बनवणे अवघड असल्याने तहसिल कचेरीतून उत्पन्न आणि नॉन क्रिमिलियर दाखले देण्याचे काम बंद झाले आहे. राज्य सरकारने या काम बंद आंदोलनाची दखल घेऊन १८ आॅक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकात उत्पन्न अथवा इतर दाखले देण्याचे अधिकार फक्त तहसिलदारांना असल्याचे नमूद केले आहे. तलाठ्याने दिलेला दाखला तहसिलदारांकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विहीत असून तलाठ्याने दिलेल्या दाखल्यास उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून वैधता नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी तहसिलदारांकडे अर्ज करणे अपेक्षित असून तलाठ्यांनी दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या आधारे लाभार्थीला कोणताही लाभ देणे अपेक्षित नाही.
>तलाठ्यांनी उत्पन्नाचे दाखले देण्याचे काम बंद केले आहे. सरकारने निर्णय घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत वैद्यकीय मदत आणि विद्यार्थ्यांना लागणारे दाखले कागदपत्रांची पडताळणी करून त्वरीत देण्याचे निर्देश सेतू व्यवस्थापनाला दिले आहेत.
-दीपक क्षीरसागर, प्रांत. वसई.