तलाठी कार्यालय गावापासून ‘कोसो’ दूर; करावी लागते पदरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 12:15 AM2021-01-25T00:15:16+5:302021-01-25T00:15:26+5:30
नायगाव पूर्वेतील परेरानगर हे ठिकाण परप्रांतीय लोकवस्ती असलेले आहे. या ठिकाणी एकही नागरिक शेतकरी नाही.
पारोळ : नायगाव पूर्वेतील जुचंद्र हे गाव शेतीप्रधान असून, आजही येथील मोठ्या प्रमाणावरील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेती संदर्भातील कामांसाठी येथील शेतकऱ्यांना नेहमीच तलाठी कार्यालय गाठावे लागते. जुचंद्रमध्ये सरकारी भूखंड असताना महसूल विभागाने जुचंद्रपासून कोसोदूर असलेल्या परेरानगर या ठिकाणी तलाठी कार्यालय बांधले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पदरमोड करून जुचंद्र तलाठी कार्यालय गाठावे लागते. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नायगाव पूर्वेतील परेरानगर हे ठिकाण परप्रांतीय लोकवस्ती असलेले आहे. या ठिकाणी एकही नागरिक शेतकरी नाही. मात्र, तरीही या ठिकाणी तलाठी कार्यालय स्थापन करण्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसत कार्यालयात यावे लागते. शेती संबंधातील सातबारा उतारे, खावटी दाखला, रेशनकार्ड, विविध दाखले, फेरफार, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कोसोदूर असलेल्या परेरानगर येथील तलाठी कार्यालयात जावे लागते. त्यातही कधी-कधी तलाठीच कार्यालयात हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसे वाया जातात. तलाठी अधिकाऱ्याला फोन लावल्यानंतर तलाठी फोन उचलत नाहीत. आधीच एकही शेतकरी नसलेल्या परेरानगर परिसरात तलाठी कार्यालय आणि त्यातही तलाठ्याची मनमानी यामुळे जुचंद्र येथील स्थानिक शेतकरी संतापलेले आहेत.
कामांसाठी मारावे लागतात हेलपाटे
जुचंद्र गावातील शेतकऱ्यांना वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारूनही अनेकदा कामे होत नाहीत. यामुळे या परिसरातील शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.