टॅलेंट सर्चच्या प्रश्नपत्रिकेत ७२ चुकांचा विक्रम, शिक्षण विभागच नापास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 05:58 AM2020-01-29T05:58:24+5:302020-01-29T05:58:38+5:30

जिल्ह्यात अन्य तालुक्यात कुठेही ही परीक्षा पद्धत न राबविता फक्त पालघर तालुक्यातच ही पद्धत राबविण्याची सक्ती का? असा सूर शिक्षक वर्गातून व्यक्त केला जात आहे.

Talent Search Questionnaire has a record of 72 mistakes, failing the education department | टॅलेंट सर्चच्या प्रश्नपत्रिकेत ७२ चुकांचा विक्रम, शिक्षण विभागच नापास

टॅलेंट सर्चच्या प्रश्नपत्रिकेत ७२ चुकांचा विक्रम, शिक्षण विभागच नापास

googlenewsNext

पालघर : तालुक्यातील पहिली ते आठवीच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी पंचायत समिती पालघरच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या पालघर टॅलेंट सर्च परीक्षेच्या बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल ७२ चुका आढळून आल्या आहेत. यामुळे या टॅलेंट परीक्षेत पालघर पंचायत समितीचा शिक्षण विभाग ‘नापास’ झाल्याचा सूर पालक वर्गातून निघत आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, परीक्षेविषयी वाटणारी भीती दूर व्हावी, स्पर्धा परीक्षेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासूवृत्ती वाढावी, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे व सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे या परीक्षेच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उतरता यावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून गटशिक्षणाधिकारी तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र खताळ यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा घेण्यात आली. पालघर तालुक्यातील ४०७ जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण २४ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्या परीक्षेमधून टॉपर येणारे गुणवत्ताधारक विद्यार्थी शोधून त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने प्रोत्साहित केले जाईल, असे मत डॉ. खताळ त्यांनी व्यक्त केले होते. मात्र प्रत्यक्षात भावी शिक्षक, अधिकारी घडविण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत अक्षम्य अशा चुका करण्यात आल्याचे दिसून आले. ज्यांनी हा पेपर काढला त्याची शैक्षणिक पात्रतेची तपासणी करण्याची गरज असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियमांना बगल देत एक आगळी-वेगळी कार्यपद्धती राबविली जात असून सदोष प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात अन्य तालुक्यात कुठेही ही परीक्षा पद्धत न राबविता फक्त पालघर तालुक्यातच ही पद्धत राबविण्याची सक्ती का? असा सूर शिक्षक वर्गातून व्यक्त केला जात आहे. या परीक्षेसाठी ५ लाखाचा निधी पंचायत समिती पालघरकडून मंजूर केलेला असल्याची माहिती पुढे येत आहे. सदरचा निधी कोणत्या निकषांनी मंजूर आहे, सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांसाठी लाख- भराचा प्रत्यक्ष खर्च असताना उर्वरित पैशाचे काय? असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. सध्या दुसरी चाचणी परीक्षा सुरू असून ती संपते न संपते तोच स्कॉलरशीप परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे, नंतर मार्चमध्ये अंतिम परीक्षा होणार असून या सर्व परीक्षा राबविताना शिक्षक व्यस्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडणार असून त्यावर सततची प्रशिक्षण, शिक्षणबाह्य कामे लादली जात असल्याने शिक्षक मेटाकुटीला आला असून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या पदरी काय पडले?
गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी एक समिती स्थापन करून केंद्रप्रमुख भालचंद्र संखे, विश्वास पावडे, किशोर संखे आणि सर्व केंद्र प्रमुख यांनी परीक्षा प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारून ही परीक्षा पार पाडली. मात्र या परीक्षेसाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे ४ लाखांच्या खर्चातून विद्यार्थ्यांच्या पदरी काय पडले आहे? असा सवाल केला जात आहे.

Web Title: Talent Search Questionnaire has a record of 72 mistakes, failing the education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर