तलवाडा आरोग्य के ंद्राला ठोकणार टाळे!
By admin | Published: June 21, 2017 04:21 AM2017-06-21T04:21:58+5:302017-06-21T04:21:58+5:30
तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ढासळलेली असून एक ग्रामीण रुग्णालय, तर तलवाडा, कुंर्झे, मलवाडा अशी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत
राहुल वाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ढासळलेली असून एक ग्रामीण रुग्णालय, तर तलवाडा, कुंर्झे, मलवाडा अशी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत उपकेंद्रे अशी यंत्रणा काम करीत आहे़ मात्र ती तोकडी असून त्यामध्येही नियोजनाचा अभाव आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र खेडोपाडी असल्याने सहसा तेथे डॉक्टर उपलब्ध नसतात.त्यामुळे त्यांचा रुग्णांना पाहीजे तसा लाभ होत नाही़ त्यामुळे आता ज्या आरोग्य व उप केंद्रामध्ये नेमणूक केलेले कर्मचारी व डॉक्टर उपस्थित नसतील अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांना व उपकेंद्राना तालुका श्रमजीवीच्यावतीने टाळे ठोकण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक तलवाडा आरोग्य केंद्राचा लागला असून २२ जून रोजी या आरोग्य केंद्रावर मार्चा नेऊन टाळे ठोकण्यात येणार आहे़ व हे आरोग्य केंद्र गुरांचा कोेंडवाडा असल्याचेही जाहीर केले जाणार आहे, तर येथे नेमणुकीस असलेले डॉ़ रितेश पटेल यांना दाखवा आणि २ हजार रुपये बक्षिस मिळावा अशी मोहिम राबवत असल्याची माहिती तालुका संघटक रुपेश डोले यांनी निवेदनाद्वारे पत्रकारांना दिली आहे़
तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेला संपूर्ण भाग हा शंभर टक्के आदिवासी व जंगली असल्याने पावसाळयात साथीचे आजार बळावत असतांत तर संर्पदंश, विंचूदंशाचे रुग्णही कायम असतात, असे असतांनाही येथे गेल्या एक वर्षापासून डॉक्टर नाहीत,मार्च मध्ये एका डॉक्टरची बदली झाली असून ती जागाही रिक्तच आहे़ या ठिकाणी डॉ़ रितेश पटेल यांची नेमणूक असल्याचे समजते़ मात्र ते या ठिकाणी कधीही फिरकत नाहीत. ते पालघर/ठाणे येथे कार्यालयीन कामासाठी वा मिटींगसाठी गेले असल्याचे सांगण्यात येत असल्याने श्रमजीवीने डॉ़ रितेश पटेल दाखवा आणि २ हजार रुपये मिळवा, असे घोषित केले आहे.