टॅँकरचे १२ प्रस्ताव मंजूर, १७ धूळखात
By admin | Published: March 10, 2017 03:35 AM2017-03-10T03:35:00+5:302017-03-10T03:35:00+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
- रविंद्र साळवे, मोखाडा
दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असल्याने आदिवासी बांधवांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे मार्च एप्रिलमध्ये उधभवणाऱ्या भीषण पाणी टंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, त्या संदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टॅँकरच्या १२ प्रस्तावांना मंजूरी मिळाली असून १७ प्रस्ताव अजुनही धुळखात पडून आहेत.
मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून तालुक्यातील धामणी कुंडाचापाडा तुंगारवाडी स्वामीनगर दापटी ब्राम्हणगाव हटीपाडा घोसाळी गोळीचा पाडा धामोडी पेंडक्याची ठवळ पाडा टेलीउंबरपाडा असे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे २९ प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने सादर केलेले मोखाडा तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांना २४ तासात मंजुरी देणे असा शासन नियम असताना एक महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर गोळीचापाडा, धामोडी, दापटी , धामणी, स्वामीनगर, कुंडाचापाडा, ब्राम्हणगाव, तेलीउबरपाडा, ठवळपाडा, चास, हटितीपाडा असे ३ गावे ९ पाड्यांचे प्रस्ताव व यांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८ टॅकर मंजूर करण्यात आले आहेत.
परंतु सध्याच्या स्थितीला धामोडी गोळीचा पाडा ठवळपाडा अशा तीन गावपाड्यांना २ टँकरने पाणी पुरवठा सुरु असून १ टँकर उभे करून ठेवले आहेत.
उर्वरित १७ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर धूळखात पडले आहेत. यामुळे येथील गावपाड्यांना अद्याप तरी त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. दरवर्षीच येथील भूमीपुत्रान वर पाणी टंचाईचे संकट येत असल्याने घोटभर पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागते. टँकरच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्च करणारे प्रशासन या ठिकाणी मुबलक पाणीसाठा असूनही निजोजन करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
जिल्हाधिकाऱ्यांचे सदोष धोरण अन् टंचाईचा कळस
- झोपी गेलेले प्रशासन अजूनही पाणी टंचाई कडे गांभीर्य ने बघत नाही येथील रोजगाराचा प्रश्न किंवा कुपोषण पाणीटंचाई समस्या असो माध्यमांची भूमिका निर्णायक राहिली आहे. गेल्या काही महिन्यापासून मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधव पाणी टंचाईच्या समस्येने बेजार झाला आहे.
याबाबत लोकमतने सडेतोड लिखाण करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. त्याच बरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा टँकरच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिल्याने तात्काळ ९ प्रस्ताव व ६ टँकर मंजूर केल्या आहेत परंतु असे असले तरी घोटभर पाण्यासाठी कोसोमैल भटकंती करावी लागत आहे.
२४ तासात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण असताना जिल्हाधिकारी या धोरणाची अम्मल बजावणी करीत नाहीत. त्यामुळे एक महिन्याचा कालावधी नंतरही १७ प्रस्ताव पडून आहेत. १२ प्रस्तावना मंजुरी दिली असली तरी ३ गावानाच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.