साखरा धरण प्रकरणी टँकरचालकांवर गुन्हा दाखल; डहाणू तालुक्यातील २९ गावांना होतो पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:49 AM2020-02-06T00:49:15+5:302020-02-06T00:49:35+5:30
नागरिकांत संताप
डहाणू : डहाणू तालुक्यातील नगरपरिषद, वाणगाव, चिंचणीसह पश्चिमेकडील २९ गावांतील लाखो लोकांची तहान भागवणाऱ्या साखरा धरणाजवळ रस्त्याच्या बाजूला घातक रसायन टाकल्याच्या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाणगाव जवळील साखरा धरणाजवळ रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या घातक रसायनामुळे या भागात दुर्गंधी पसरली होती. याबाबत प्रसारमाध्यमांत क्लिप व्हायरल झाल्याने प्रशासनाकडून तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत संबंधित विभागांना सूचित केले.
डहाणू विधानसभेचे आ. विनोद निकोले, पालघरचे आ. श्रीनिवास वनगा यांनीही याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता राजन दाधवड यांनी टँकरच्या चालकाविरुद्ध वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या धरणात रसायन टाकल्याच्या भीतीने काही लोकांना धरणातून होणाºया पाणीपुरवठ्याबाबत संभ्रम होता. सेरेक्स ओव्हरसिज कंपनीचे जनरल मॅनेजर राजेश द्विवेदी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे. याबाबतचा पुढील तपशील समजू शकला नाही. याप्रकरणाचा तपास वाणगाव पोलीस निरीक्षक राकेश पगारे हे करत आहेत.