तारापूर एमआयडीसी प्रदूषण : हरित लवादाच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 01:49 AM2020-10-27T01:49:06+5:302020-10-27T01:49:29+5:30
Tarapur News : तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणासंदर्भात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने २०१६ साली हरित लवाद, पुणे येथे याचिका दाखल केली होती,
पालघर : तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे कॅन्सर, किडनी रोगासारखे गंभीर आजार निर्माण झालेल्यांना विनामूल्य आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश हरित लवादाने दिले होते. चार वर्षांपासून आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडून केली जात नसल्याने याचिकाकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतल्यावर आरोग्य अधिकारी आणि संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरच उपाययोजना आखण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणासंदर्भात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने २०१६ साली हरित लवाद, पुणे येथे याचिका दाखल केली होती. प्रदूषणामुळे झालेला दुष्परिणाम आणि करावयाची उपाययोजना याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी आयआयएम आणि आयआयटी अहमदाबाद, सीपीसीबी, एमपीसीबी यांची एक संयुक्त समिती गठीत केली होती. या समितीने तारापूर एमआयडीसी आणि परिसरातील १३ गावांचे सर्वेक्षण केल्यानंतर पर्यावरणाची झालेली अपरिमित हानी आणि मच्छीमारांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम यासंदर्भात अहवाल दाखल केला होता. प्रदूषणामुळे परिसरातील भूगर्भातील जलसाठेही प्रदूषणयुक्त झाल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने आरोग्य शिबिरे आयोजित करून बाधितांना विनामूल्य आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, ही बाब याचिकाकर्त्यांनी सालीमठ यांच्या निदर्शनास
आणून दिली.
प्रदूषणामुळे १३ हजारांहून जास्त लोक विविध विकारांनी ग्रस्त
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वेक्षणात २०१३ ते २०१६ सालादरम्यान दांडी, तारापूर, मुरबे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांंतील जवळपास १३ हजार १८९ रुग्ण कॅन्सर, त्वचारोग, किडनीच्या विकाराने ग्रस्त असल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश हरित लवादाने दिले असताना जिल्हा परिषदेकडून चार वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अजूनही कार्यवाही होत नसल्याने याचिकाकर्ते संतोष मर्दे, नरेंद्र नाईक, कुंदन दवणे, निलेश घरत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सालीमठ यांची सोमवारी भेट घेऊन ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
प्रदूषित कारखान्यांवर कठोर कारवाई करा!, पालकमंत्र्यांचे निर्देश
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगिरी करायला हवी. तसेच झालेल्या दुर्घटनांना जबाबदार आणि जे कारखाने प्रदूषण नियंत्रणाचे निकष पाळणार नाहीत, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
पालघर जिल्ह्यातील तारापूर-सारख्या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रिया केंद्र यासंदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इत्यादी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पालघरचे उपविभागीय अधिकारी डी. एस. नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
येत्या महिन्याभरात प्रदूषण पातळीत कमालीची घट आणण्याकरिता प्रयत्न करावेत, असे निर्देष पालघरचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी देऊन यंत्रणांनी समन्वयातून ही कामगिरी करताना ते प्रत्यक्षात दिसले पाहिजे, अशी सक्त ताकीद दिली आहे. यापूर्वी तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनांना जे जे विभाग जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिला असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी गांभीर्याने काम करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या
आहेत.