प्रदूषणामध्ये तारापूर देशात प्रथम क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:13 PM2019-07-20T23:13:10+5:302019-07-20T23:13:37+5:30
राष्ट्रीय हरित लवादाने शंभर उद्योगाची प्रसिद्ध केली यादी, तारापूरचा प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९
पंकज राऊत
बोईसर : देशातील पहिल्या १०० प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्राची यादी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) प्रिन्सिपल बेंच समोर झालेल्या सुनावणीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये तारापूर एमआयडीसी प्रदूषणामध्ये पहिल्या क्र मांकावर आले असून आता तरी केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूरचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी खंबीर भूमिका घेणे गरजेचे आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रात सीपीसीबी टू रँक इंडस्ट्रीयल युनिटस् आॅन पोल्युशन लेव्हल्स यासंदर्भात आलेले वृत्त तसेच मूळ अर्ज नंबर १०३०/२०१८ नुसार दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी १० जुलै २०१९ रोजी न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल (चेअरपर्सन), न्या.एस.पी.वांगडी, (ज्युडीशिअल मेंबर), न्या.के.रामकृष्णन (ज्युडिशिअल मेंबर ) व डॉ नगीन नंदा (एक्सपर्ट मेंबर) यांच्या खंडपिठासमोर झाली.
या याचिकेची सुनावणी करताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील औद्योगिक क्षेत्रांना त्यांच्या प्रदूषण करण्याच्या पातळीवर क्रमांकवारी ठरवून (कॉम्प्रेहेन्सिव्ह एन्व्हायरमेंट पोल्युशन इंडेक्स) सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकच्या आधारित देशातील शंभर औद्योगिक क्षेत्राची यादी ठरविण्यात आली आहे.
तारापूरमधील प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९ इतका सर्वाधिक नोंदवण्यात आला आहे. या खालोखाल नाजफग्रह- ड्रेन बिसन यांच्यासह आनंद प्रभात, नाराऐना, ओखला, वाझिरपूर (दिल्ली) (निर्देशांक ९२.६५) उत्तर प्रदेशमधील मथुरा (निर्देशांक ९१.१०) व कानपूर ( निर्देशांक ८९.४६) तर गुजरातमधील वडोदरा शहराचा (निर्देशांक ८९.०९) असे देशातील पहिले पाच प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्र असल्याचे समोर आले आहे.
औद्योगिक क्रियाशिलतेचे मोजमाप, पर्यावरण विषयक मापदंड, कायदयाचे होणारे उल्लंघन, स्थानिकांची आरोग्यविषयक माहिती तसेच पर्यावरण नियमांची माहिती व कायद्याच्या पूर्तता या बाबी विचारात घेण्यात आल्या. या शंभर औद्योगिक क्षेत्रांपैकी ३८ क्षेत्र हे क्रिटिकल पोल्युटेड एरिया या अंतर्गत येत असून इतर ३० औद्योगिक क्षेत्र हे सिव्हीअर पोल्युटेड एरिया आहे.
राज्यातील चंद्रपूर क्षेत्र २७ व्या क्र मांकावर (निर्देशांक ७६.४१) आहे तर ३९ व्या क्रमांकावर औरंगाबाद (निर्देशांक ६९.८५), ४० व्या क्र मांकावर डोंबिवली (निर्देशांक ६९.६७), ४१ व्या क्र मांकावर नाशिक (निर्देशांक ६९.४९), ५१ व्या क्र मांकावर नवी मुंबई (निर्देशांक ६६.३२), ८० व्या क्र मांकावर चेंबूर औद्योगिक क्षेत्र (निर्देशांक ५४.६७), ८६ व्या क्र मांकावर पिंपरी-चिंचवड (निर्देशांक ५२.१६) तर ९२ व्या क्रमांकावर महाड (निर्देशांक ४७.१२) असल्याचे राष्ट्रीय हरित लवादाने प्रसिद्ध केलेल्या यादीवरून दिसून येते आहे.