तारूनिया सकळां, आम्हां कृपादृष्टी पाहे; विसर्जनाला पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:26 PM2019-09-13T23:26:43+5:302019-09-13T23:26:54+5:30
भावपूर्ण वातावरणात निरोप
पालघर : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी, अनंत चतुर्दशीला भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या विसर्जन मिरवणुकांना पावसाने देखील जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर कायम असतानाही जिल्ह्यातील ५९७ सार्वजनिक आणि ४ हजार ३७२ खाजगी गणपतींचे विसर्जन कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले.
आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातलेले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. तर सार्वजनिक मंडळाचे गणपती संध्याकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी बाहेर पडले. पालघरमधील तिवारी कुटुंबियांचा ‘फुलांचा राजा’ आणि जुन्या पालघरमधील ‘पालघरचा राजा’ या दोन प्रसिद्ध गणपतींना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त उपस्थित होते. ‘फुलांचा राजा’ हा गणपती नेहमीच भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला असून यावर्षी गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूस विविध फुलांचा वापर करून गजराजांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, लेझीम पथकांची मानवंदना देण्यात येत असताना रस्त्या-रस्त्यावर राजकीय पक्षांकडून सर्व गणेश मंडळांचे फूल, श्रीफळ तसेच मानचिन्ह देऊन स्वागत केले जात होते. संध्याकाळी ७ च्या सुमारास गणेश मंडळांची मोठी गर्दी झाली असताना विसर्जन पाहण्यासाठी आलेले लोक आणि कामावरून परतणारे चाकरमानी अशी अलोट गर्दी होती. अशावेळी पालघर पोलीस आणि अनिरुद्ध बापू स्वयंसेवी अनुयायांनी या गर्दीवर नियंत्रण आणून वाहतूकही सुरळीत केली.
पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने विशेष दक्षता घेतली होती. या उत्सवाला कुठलेही गालबोट न लागता हे सण शांततेत साजरे व्हावेत या दृष्टीने कडक पावले उचलली होती. तसेच उत्सवादरम्यान एकूण १ हजार ८८१ जणांवर कारवाई करण्यात आली.
विसर्जनाच्या निर्माल्यातून २० टन सेंद्रिय खत
मुंबई : दरवर्षी अनंत चतुर्दशीनंतर मुंबईतील चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (अलिबाग)चे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण रक्षणासाठी निर्माल्यातून सेंद्रीय खताची निर्मिती करण्याच्या स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यंदा गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून फुल, फळे आणि आरास इत्यादी निर्माल्य गोळा करून त्याचे रूपांतर सेंद्रिय खतात केले जाणार आहे. तिन्ही ठिकाणच्या निर्माल्यातून सुमारे २० ते २५ टन सेंद्रीय खत निर्माण केले जाणार आहे. गेल्यावर्षी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मोखाड्यात गणपती बाप्पाला निरोप
मोखाडा : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’, या घोषणा, त्याचप्रमाणे ढोलताशे, पांरपरिक सनई - संबळाच्या तालावर तसेच बेंजोची साथ, डीजेची साथ आणि गुलालाची उधळण करत तालुकावासियांनी दहा दिवस विराजमान असलेल्या बाप्पाला निरोप दिला. मोखाड्यात दहा दिवस विराजमान होणाऱ्या गणरायांची संख्या कमी असल्याने शांततेत तसेच गावपाड्यांतील भक्तांनी स्थानिक नदी पात्रात तर मोखाडा, घोसाळी येथे तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खात्याने चोख व्यवस्था ठेवली होती.