...आणि वसईतील विविध समुद्रकिनारी हजारो बोटी जमा होण्यास सुरुवात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:03 PM2021-05-15T20:03:41+5:302021-05-15T20:04:09+5:30
अरबी समुद्रात चक्रीवादळाचा गंभीर इशारा देण्यात आल्याने मागील चार दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या वसई तालुक्याच्या बंदरांतील मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतण्यास सुरुवात झाली आहे.
आशिष राणे,वसई
अरबी समुद्रात चक्रीवादळाचा गंभीर इशारा देण्यात आल्याने मागील चार दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या वसई तालुक्याच्या बंदरांतील मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतण्यास सुरुवात झाली आहे. तर काही बोटींनी गुजरात तथा दीवच्या किनाऱ्यावर आश्रय घेतल्याचे समजते.
या वादळाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस राहणार असल्यामुळे तोपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा यापूर्वीच हवामान खात्याने दिला आहे. त्या त्या जिल्ह्यातील मच्छिमार बांधव व किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता म्हणून त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा व वसई विरार महापालिका प्रशासनाकडून देखील मच्छिमार व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मागील चार दिवसांपासून केंद्र व राज्य शासनाने अलर्ट होऊन सर्व माहिती माध्यमाद्वारे देत हे वादळ परतून लावण्यासाठी अथवा या चक्री वादळाने किनारपट्टीवर जीवित वा कुणाच्याही मालमत्तेची हानी होऊ नये
यासाठी जिल्हा स्तरावर गृह व महसूल यंत्रणेद्वारे विविध उपाययोजना म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त स्थनिक पातळीवर महापालिका प्रशासनाकडून अग्निशमन दलाची कुमक व त्यांच्या अत्याधुनिक यंत्रणेला पाचारण करण्यात आले आहे. अर्थातच हे चक्री वादळ व त्याला रोखण्यासाठी जिल्हा व स्थानिक यंत्रणा सज्ज झाली आहे. परिणामी वसईतील स्थानिक पातळीवर देखील प्रशासनाने आवाहन केल्यानुसार दोन दिवसांपासून वसईतील विविध समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बोटी परतू लागल्या आहेत.
मच्छिमार बांधवांना बसणार मोठा आर्थिक फटका ?
एकूणच 20 एप्रिल नंतर मासेमारी अशीही बंदच होते तर हे पूर्वनियोजित चक्रीवादळ येण्यापूर्वीच हजारो मच्छिमार बांधव समुद्रात मासेमारी साठी दुर दूरवर गेले होते. मात्र आता हवामान खात्याने व जिल्हा व महापालिका प्रशासनाने गंभीर इशारा दिल्यानं मच्छिमाराना मासेमारीची फेरी अर्धवट सोडून द्यावी लागणार असल्याने या वादळाचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसणार आहे.
आणि हजारो मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतू लागल्या !
वसई तालुक्यातील नायगाव, खोचिवडे, वसई, अर्नाळा आदी या बंदरातील शेकडो मच्छीमार मागील चार दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेले होते. याचवेळी हवामान खात्याकडून या वादळाचा इशारा आल्यावर मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी शनिवारी किनाऱ्यावर परतू लागल्या आहेत. तर काही बोटींनी सुरक्षेसाठी गुजरात तथा दीवच्या किनाऱ्याच्या दिशेने गेल्या आहेत. इशारा मिळण्याआधी आम्ही मासेमारीसाठी इच्छितस्थळी पोहोचलो होतो. ज्याठिकाणी मासेमारी करतो तिथून वसईच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी २४ तासांचा अवधी लागतो. मात्र याठिकाणाहून गुजरात तथा दीवचा किनारा अवघ्या दोन तासांवर आहे. वसईला परत येताना परतीच्या प्रवासात वादळामुळे काही अनुचित घडू नये, यासाठी आम्ही दीवच्या किनाऱ्यावर बोटी आणल्या, अशी माहिती वसईतील बहुतेक मच्छीमार बांधवांनी दिली आहे.
किंबहुना वादळ निवळल्यानंतर काही मच्छिमार बोटी वसईला परत येणार आहेत. गुजरात आणि दीवच्या किनाऱ्यावर वसई, अर्नाळा याठिकाणच्या बोटी नांगरून ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे.
एका फेरीचा खर्च वाया
मासेमारीकरिता खोल समुद्रात जाताना मच्छीमारांना सात ते आठ दिवसांच्या एका फेरीकरिता डिझेल, बर्फ, रेशन, खलाशांचे वेतन इत्यादीकरिता जवळपास एक ते दीड लाखाचा खर्च येतो. एका बोटीवर बारा ते पंधरा खलाशी असतात. प्रत्येक खलाशाला 12 ते 15 हजार रुपये वेतन द्यावे लागते.
तो खर्च 70 ते 80 हजार रुपये होतो. 800 लिटर डिझेल, 5 ते 6टन बर्फ आणि शिधासामग्री असा हा एका फेरीचा दीड लाख रुपयांचा खर्च असतो. वादळामुळे मासेमारी बोटी परत आल्यामुळे फेरीचा खर्च वाया गेला आहे. आता वादळ शमल्यावर नव्याने खर्च करून मासेमारीकरिता जावे लागणार असल्याचे वसईतील मच्छीमारांनी सांगितले.