शिक्षक दिन; पालघर जिल्ह्यात ‘शाळा आपल्या घरी’ उपक्रमाचा श्रीगणेशा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 01:26 PM2020-09-05T13:26:02+5:302020-09-05T13:26:23+5:30
बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज हितेंद्र ठाकूर यांनी ‘शाळा आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम आजच्या शिक्षक दिनी हाती घेतला
वसई : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात अवघ्या जगात त्या त्या देश तसेच राज्यपातळीवर ऑनलाइन शिक्षण पद्धत सुरू असली तरी अद्याप 27 % मुला-मुलीकडे इंटरनेटची बिलकुल सुविधा किंवा साधा मोबाइल ही नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन पालघर जिल्हातील दुर्गम भागातील तसेच वसई-विरारमधील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाची गंगा’ पोहोचविण्याकरिता बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज हितेंद्र ठाकूर यांनी ‘शाळा आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम आजच्या शिक्षक दिनी हाती घेतला असून, यामुळे इयत्ता 1 ते 10 वीच्या वर्गातील लाखो मुलांना याचा लाभ होणार आहे.
‘शाळा आपल्या घरी’ या अनोख्या उपक्रमाद्वारे वसई तालुक्यातील शिक्षकांना आवाहन करून, पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम इंग्रजी व मराठी भाषेत रेकाॅर्ड करण्याचे काम सुरू झाले आहे. हा अभ्यासक्रम वसई तालुक्यातील कार्यरत स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून लाखो मुलांच्या घराघरात पोहोचविला देखील जाणार आहे. टीम वसई फर्स्ट आणि डिजिटल वसई या सामाजिक संस्थाचे या उपक्रमास तांत्रिक सहकार्य लाभले आहे. एवढंच नव्हे तर हा रेकाॅर्ड केलेला अभ्यासक्रम महाराष्ट्रातील कोणत्याही स्थानिक पातळीवर राबवायाचा असल्यास बहुजन विकास आघाडीकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगण्यात आले. एकूणच हा अभ्यासक्रम एस. एस. सी बोर्डावर आधारित असणार आहे.
‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ ; हे तर शासनाचे धोरण ?
विशेषतः केवळ इंटरनेट किंवा मोबाईल नाही, म्हणून एकही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता आपण हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. सध्या मराठी व इंग्रजी माध्यमांचा अभ्यासक्रम रेकाॅर्ड करण्याचे काम सुरू आहे. मात्र भविष्यात इतर माध्यमांचा अभ्यासक्रम अशाच पद्धतीने रेकाॅर्ड केला जाईल. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी वसई-विरार केबल कंपनी व त्यांच्या चॅनलचे सहकार्य ही घेतले जात असल्याची माहिती बविआचे नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी लोकमतला सांगितले.
तसेच आपला मुद्दा विशद करताना, शिक्षकदिनी एक लोकप्रतिनिधी म्हणून वसई-विरार जनतेकडून हा उपक्रम आम्ही महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना अर्पण करीत आहोत, असे ही त्यांनी आवर्जून नमूद केले. उपक्रमासाठी शिक्षकांचे समायोजन, अभ्यास क्रम, वेळापत्रक नेमून देणे, यासाठी प्राचार्य माणिक दुतोंडे आणि प्राचार्य कल्पना राऊत नेतृत्व करत आहेत. या उपक्रमानिमित्ताने सर्व शिक्षक नवीन तंत्रज्ञान शिकत असल्याने ही समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य माणिक दुतोंडे सर यांनी दिली.
कसे असेल अभ्यसक्रमाचे वेळापत्रक!
1.) केबल चॅनलचे नाव : सिग्नेट मराठी(चॅनेल 53)
माध्यम: मराठी व सेमी इंग्रजी
वेळ: सकाळी 9 ते 12.30 वाजेपर्यंत पुन:प्रक्षेपण: सायंकाळ 4 ते 6.30 वाजेपर्यंत
-----------------------------
2. ) केबल चॅनलचे नाव : सिग्नेट टाॅलिवूड (चॅनेल 56)
माध्यम: इंग्रजी
वेळ: सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत
पुन:प्रक्षेपण: सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत