पदोन्नती न मिळालेल्या शिक्षकांचे होणार नुकसान, सहा वर्षांपासून प्रक्रिया रखडल्याने नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:39 AM2021-03-30T01:39:09+5:302021-03-30T01:42:45+5:30
मागील सहा वर्षांपासून रखडलेली शिक्षकांच्या विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने, त्याचा फटका एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे.
वसई - ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण नसणे आणि शिक्षकांच्या विकल्प बदल्या आदी कारणास्तव मागील सहा वर्षांपासून रखडलेली शिक्षकांच्या विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने, त्याचा फटका एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे. दरम्यान, याबाबत वसई तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेने वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन, त्यांना यात लक्ष घालण्यासाठी साकडे घातले आहे.
जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने या संदर्भात दि. ४ डिसेंबर रोजी शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांची भेट घेतली होती. बिंदू नामावली प्रक्रिया लवकरच अद्ययावत करण्यासाठी शिक्षण विभागाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी अतिरिक्त मु.का. अधिकारी वाघमारेही उपस्थित होते. परंतु त्याला ४ महिने होऊन गेले, तरी ते काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने, त्याचा फटका एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे. पालघरमधील शिक्षकांनाच हा फटका बसणार आहे. कारण ठाणे आणि अन्य ठिकाणच्या शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. यासंदर्भात रविवारी आ. हितेंद्र ठाकूर यांनी शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याशी दूरध्वनीवरून विचारणा केली.
हितेंद्र ठाकूरांना साकडे
शिक्षकांची माहिती अपूर्ण असून, ती घेण्याचे काम सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी लता सानप यांनी सांगितले. यावर आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन पाटील, अध्यक्ष मॅन्युअल डाबरे, सरचिटणीस प्रकाश उबाळे, रवींद्र घरत, डेनिस जोसेफ, हेमांगी राऊत, वंदना पाटील यांचा समावेश होता.