कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी शिक्षक उतरणार मैदानात, लोकांचे करणार समुपदेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 02:15 AM2020-09-05T02:15:07+5:302020-09-05T02:15:13+5:30
पालघर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६ हजार २१३ झाली असून ५३५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालघर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी आता शिक्षक संसर्गबाधितांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमार्फत राबविण्यात येत आहे. लोकांचे समुपदेशन करण्याच्या कामाला शिक्षकांनी काही अटीवरच संमती दिली आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६ हजार २१३ झाली असून ५३५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यात १२११ रुग्ण, जव्हारमध्ये २९८, मोखाडा तालुक्यात १५७, पालघर तालुक्यात ४७३९, तलासरीत १६९, वसई ग्रामीणमध्ये ८६६, विक्रमगड तालुक्यात ३७४, वाडा तालुक्यात ८७१ अशी एकूण ८६८५ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पालघर ग्रामीणमध्ये झाली असून बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्याचे शिवधनुष्य जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावांत लोक आता सोशल डिस्टन्सिंग पाळत नसून मास्कही वापरत नसल्याने कोरोना संसर्गाचा आकडा वाढू लागला आहे. यामुळे शिक्षक हे लोकांचे चांगल्या पद्धतीने समुपदेशन करू शकत असल्याने सुमारे ५०० शिक्षकांना यासाठी नेमण्यात आले आहे. पालघर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या बोईसर परिसर व पालघर नगरपरिषद क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र आरोग्य विभागामार्फत दर्जेदार सुरक्षित साहित्य पुरवणे अपेक्षित असताना शिक्षकांना कापडी मास्क, फक्त एक जोड हातमोजे दिले जात असल्याने चांगल्या दर्जाच्या आरोग्य साहित्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणीही शिक्षक सेनेने तहसीलदारांकडे केली आहे.
कोरोना सर्वेक्षणासाठी नेमणूक केलेल्या जिल्हा परिषदेतील स्थानिक शिक्षकांना त्याच भागात नेमणूक द्यावी, तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून दर्जेदार साहित्य पुरवावे व ५० वर्षांपेक्षा जास्त दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या शिक्षकांना या प्रक्रियेतून वगळावे, अशी मागणी पालघर तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने तहसीलदारांकडे केली आहे. इतर शिक्षकांना सामावून न घेता फक्त जिल्हा परिषद शिक्षकांना या सर्वेक्षणामध्ये सामावत असल्याचा आरोप शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आला.
सर्वेक्षणासाठी पन्नास वर्षांहून अधिक वय असलेल्या शिक्षकांची नेमणूक केली आहे. दुर्धर आजार असलेल्या व ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या शिक्षकांना या सर्वेक्षणासाठी नेमण्यात येऊ नये, असे शिक्षक सेनेने तहसीलदारांना कळवले आहे. शिक्षकांसाठी या सर्वेक्षणाबाबत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणादरम्यानही दाटीवाटीने बोलावले जात असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा प्रशासनामार्फतच उडवला जात असल्याचे दिसून आले आहे.
अखेर काही शिक्षकांना मात्र वगळणार
तहसीलदार सुनील शिंदे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यासह शिक्षकांची व तालुका आरोग्य अधिकारी यांची गुरुवारी तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये स्थानिक शिक्षकांना सर्वप्रथम प्राधान्य द्यावे व इतर मागण्या समोर ठेवण्यात आल्या. त्या अनुषंगाने या विषयाच्या चर्चेअंती ५० वर्षांवरील आणि दुर्धर आजार असलेल्या शिक्षकांना या सर्वेक्षणामधून वगळण्यात येणार आहे. तसेच अपंग शिक्षक, गरोदर माता, स्तनदा माता असलेल्या शिक्षिकांनाही या प्रक्रियेतून वगळण्यात येईल, असे तहसीलदारांनी सांगितले. तर, आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य सुरक्षाविषयीचे साहित्य पुरवण्यासाठी सकारात्मकता राहील, असे तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे यांनी सांगितले.