पांढऱ्या कांद्याने आणले पुन्हा डोळ्यांत पाणी; सलग दुसऱ्या वर्षी कर्जाचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 11:08 PM2021-04-27T23:08:18+5:302021-04-27T23:08:28+5:30
सलग दुसऱ्या वर्षी कर्जाचा डोंगर
वसंत भोईर
वाडा : रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेला वाड्याचा पांढरा कांदा तयार होऊन बाजारात येणार तोच पुन्हा लाॅकडॉऊन झाल्यामुळे घरातच पडून राहिल्याने शेतकरी चिंतित आहेत. उत्पादनासाठी केलेला खर्चही न निघाल्याने लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर डोक्यावर चढल्याने सलग दोन वर्षे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. भातानंतर येथील शेतकरी कडधान्य, भाजीपाला, फळ, फुलांऱ्या शेतीत नवनवीन
प्रयोग करू पाहात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील शेती तोट्यात चाललेली आहे. त्यात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीच्या आजाराचे संकट सुरू झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
पूर्वी एकमेव भाताचे पीक घेतले जात होते. आता मात्र पांढऱ्या कांद्याला येथील हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी पांढरा कांद्याची शेती करू लागले आहेत. चांबले, डाकिवली, केळठण, बुधावली, देवघर, कुडूस, निचोळे, गातेस, चिखला, नेहरोली, सांगे, नाणे या गावांत पांढऱ्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
कांद्याला शेणखत, दाणेदार, १८.१८.१८.अशी खते दिली जातात. एका एकराला अंदाजे ७५ हजारांचा खर्च येतो. यातून दीड लाख रुपये मिळतील अशी आशा निचोळे येथील प्रयोगशील शेतकरी सतीश पष्टे यांना वाटत होती. गेल्या वर्षीचे सर्व काही विसरून पुन्हा नव्या उमेदीने पांढऱ्या कांद्याची लागवड मोठ्या आशेने केली. पीकही बहरून आले, मात्र पुन्हा लाॅकडॉऊन झाल्यामुळे तयार झालेला कांदा घरीच पडून राहिल्याने येथील बळीराजाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर चढल्याने तो पार मेटाकुटीस आला आहे.