प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्पवयीन मुलीवर उपचार करणाऱ्या मद्यपी कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 07:51 PM2023-03-27T19:51:34+5:302023-03-27T19:54:46+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
हितेंन नाईक -
पालघर- तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी स्टाफ नर्सकडून (पुरुष) चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या आदेशानंतर, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.
ज्या अर्थी हा कर्मचारी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता, त्या अर्थी यापूर्वीही त्याने असे प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट होते. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मूक संमती शिवाय हे शक्य नसल्याने त्यांच्यावरील कारवाईचे काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या एका १३वर्षीय मुलीवर उपचार करण्यासाठी त्या केंद्रातील डॉक्टरांना बोलवण्या ऐवजी तेथे नियुक्त. संबंधित स्टाफ नर्स (पुरुष) या पदावर कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने त्या मुलीवर उपचार सुरू करीत इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. ह्यावर त्या मुलीच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यानंतर, या कर्मचाऱ्याने त्यांनाच उलट सुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. हो मी दारू प्यायलोय, असेही तो म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महत्वाचे म्हणजे उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या समोरच हा प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. नातेवाईकांनी केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून हा प्रकार समोर आल्यानंतर प्रसार माध्यमांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर जिल्हा परिषद यंत्रणा हलली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,आरोग्य सभापती संदेश ढोणे ह्यांनी ह्या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे ह्यांनी कंत्राटी कामगार राकेश आढाव ह्याची सेवासमाप्ती करण्याचे लेखी आदेश काढले.
VIDEO: प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्पवयीन मुलीवर उपचार करणाऱ्या मद्यपी कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई#PrimaryHealthCentre#palgharpic.twitter.com/vKWzU6h6Fs
— Lokmat (@lokmat) March 27, 2023
परंतु कर्मचारी रुग्णावर उपचार करीत असताना तिथे संबंधित वैद्यकीय अधिकारी ही उपस्थित असल्याने त्यांच्या मुक संमती शिवाय हे शक्य नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. असे उपचार यापूर्वीही अनेक वेळा घडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भविष्यात अशा प्रकारे मद्यपान करणारे आणि कामचुकार कर्मचारी आढळल्यास तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिला.