भाईंदरमध्ये शिवजयंतीवरून ठाकरे - शिंदे गट आमने सामने
By धीरज परब | Published: March 8, 2023 11:19 AM2023-03-08T11:19:45+5:302023-03-08T11:20:50+5:30
स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवसेनेच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. तेथे मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन केले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर पूर्वेला नवघर मार्ग, स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवजयंती साजरी करण्या वरून शिवसेनेचा शिंदे गट व ठाकरे गट आमने - सामने आले आहेत. ठाकरे गटाच्या अर्जावर पोलिसांनी परवानगी दिल्या नंतर त्यास शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिवजयंती साजरी करण्यावरून वाद निर्माण झाला आहे . पक्ष, कार्यालये व शाखांवर ताबा घेण्याचे भांडण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्यंत पोहचले आहे.
स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवसेनेच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. तेथे मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन केले जाते. पूर्वीपासून शिवजयंती साजरी करताना नवघर पोलिसांना पत्र दिले जायचे. यंदा १० मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हा संघटक जयलक्ष्मी सावंत व उपशहर प्रमुख राजाराम सावंत यांनी नवघर पोलिस, महापालिका, वाहतूक पोलीस आदींना अर्ज दिले होते.
त्यानुसार सावंत यांना शिवजयंती साजरी करण्यासाठी नवघर पोलिसांनी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ४ मार्च रोजी पालिकेच्या प्रभाग अधिकारी यांना परवानगी देण्या बद्दल नाहरकत पत्र दिले होते . वाहतूक पोलीस व नवघर पोलिसांनी शिवजयंती साजरी करण्यास नाहरकत दिल्याने सोमवारी सावंत हे प्रभाग समिती कार्यालयात पालिकेच्या परवानगी शुल्कची पावती फाडण्यास गेले असता त्यांना शुल्क भरण्याची पावती देण्यास व परवानगी देण्यास नकार देण्यात आला.
त्याच परिसरातील शिवसेनेत असलेले विभागप्रमुख संतोष धामणकर हे शिंदे गटात असून त्यांनी , गेलीत वर्षी सदर जागी आपण शिवजयंती केल्याने आपणास परवानगी देण्याची मागणी करत ठाकरे गटाच्या शिवजयंतीला जागा देण्यास विरोध केला .
परवानगी थांबल्याने ठाकरे गटाच्या उपजिल्हा संघटक जयलक्ष्मी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे . पूर्वी पासून शिवसैनिक येथे शिवजयंती साजरी करत आहेत . यंदा सुद्धा आम्ही आधी रीतसर अर्ज केल्यावर पोलिसांनी आम्हाला नाहरकत दिली असताना अचानक सत्तेच्या दबावाखाली शिवजयंतीला विरोध करून आमची पालिकेची परवानगी अडवण्यात आली असे सावंत म्हणाल्या .
गेल्यावर्षी धामणकर यांना शिवजयंतीची परवानगी मिळाली असल्याने यंदा सुद्धा त्यांना परवानगी दिली पाहिजे असे शिंदे गटाचे पदाधिकारी राजेश वेतोस्कर यांनी सांगितले . तर नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांनी दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे . दोन्ही गटाने शिवजयंती वरून वाद घालू नये यासाठी थोड्या फार अंतराने दोन्ही गटाने शिवजयंती साजरी करून वाद संपुष्टात आणावा असे प्रयत्न सुद्धा केले जात आहेत .
दहीहंडीवरून देखील झाला होता वाद
सदर स्नेहा गल्ली नाक्यावर अनेक वर्षां पासून शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश नलावडे हे दहीहंडीचे आयोजन करतात . गेल्यावर्षी ठाकरे गटाचे नलावडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक राजेश वेतोस्कर शिंदे गटात गेल्यावर त्यांनी देखील त्याच जागी दहीहंडीची परवानगी मागितली होती . त्यावेळी पोलिसांनी नलावडे यांना त्याच जागी तर वेतोस्कर यांना काही अंतरावर दहीहंडी लावण्यास परवानगी देऊन वाद मिटवला होता .