विकास आराखडा विरोधी लढा ठाकुरांंनीही लढावा!

By admin | Published: February 21, 2017 05:10 AM2017-02-21T05:10:43+5:302017-02-21T05:10:43+5:30

एमएमआरडीएच्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात ठाकूर बंधूंचा सहभाग

Thakur also fight against development plan! | विकास आराखडा विरोधी लढा ठाकुरांंनीही लढावा!

विकास आराखडा विरोधी लढा ठाकुरांंनीही लढावा!

Next

वसई : एमएमआरडीएच्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात ठाकूर बंधूंचा सहभाग आवश्यक असून, त्यांनी या लढ्यात भूमीपुत्र म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन हरित वसईचे प्रणेते फादर दिब्रिटो यांनी निर्मळ येथे रविवारी बोलताना केले.
एमएमआरडीएच्या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती मार्फत लढा उभारण्यात आला आहे.त्यासाठी गावोगावी जनजागृती सभा घेतल्या जात आहेत. विकास आराखडा मराठीत प्रसिद्ध करण्याची आणि त्यावर हरकती घेण्याची, मुदत वाढवण्याची मागणी या लढ्यामार्फत पूर्ण करण्यात आली. तसेच २५ हजार हरकतीही नोंदवण्यात आल्या. या लढ्याचा पुढील भाग म्हणून जीवन विकास सोसायटीच्या सभागृहात रविवारी सकाळी अभ्यास शिबीर घेण्यात आले. या शिबीरात फादर दिब्रिटो आणि शशी सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉमणिका डाबरे, टोनी डाबरे, सिलू परेरा, सोसायटीचे अध्यक्ष सुनिल रॉड्रीग्ज उपस्थित होते.
हरित वसईचे प्रणेते फादर दिब्रिटो यांनी तर थेट आमदार हितेंद्र ठाकूर यांनाच या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तालुक्यात ठाकूर बंधू प्रभावशाली आहेत. त्यांचा या लढ्यात सहभाग आवश्यक आहे. त्यांना जनाधारही मिळाला आहे. त्यामुळे त्यांना सहभागी करून घ्यावे, असा सल्ला दिब्रिटो यांनी यावेळी वसईकरांना दिला. तर ठाकूरांनीही भुमिपुत्र म्हणून या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार हितेंद्र ठाकूर यांना त्यांनी यावेळी केले.
(प्रतिनिधी)

दररोजच्या ७३३ टन कचऱ्याचे काय?
पाणी, सांडपाणी आणि घनकचरा या मुद्द्यांवर आॅल्वीन लोपीस याने आराखड्यातील बाबी विषद केल्या. वसई तालुक्याच्या सध्याच्या लोकसंख्येला दररोज १०० एमएलडी पाण्याचा तुटवडा भासतो आहे. आराखड्यानुसार लोकसंख्या वाढली तर एवढे पाणी कुठून आणणार, १०७ एमएलडी सांडपाणी दररोज जमीनीत मुरणार आहे. त्यामुळे जमीनी नापीक होतीलच भूगर्भातील पाणीही दूषित होईल, दररोज निर्माण होणाऱ्या ७३३ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे कोणताही प्रकल्प अस्तित्वात नाही. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढणार आहे, असे आॅल्वीनने यावेळी स्पष्ट केले.

 विकास आराखड्या़वर अभ्यास केलेल्या रॉजर रॉड्रीग्ज या तरुणाने आराखड्यातील काही धोकादायक मुद्दे यावेळी मांडले. गोगटे सॉल्टच्या १५०० एकर जमीनीवर भराव टाकून ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याऐवजी ते गावात शिरेल आणि पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होईल.

 वाढत्या वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले आहेत. विकास आराखड्यानुसार वसईत हॉटेल, मोटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे होम्स, क्लब हाऊसचाही धोका वाढणार आहे. तरीही हा आराखडा वसईसाठी नाही असा बुद्धीभेद केला जात आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Thakur also fight against development plan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.