ठाणे वाडा अंतर घटविणाऱ्या पुलाचे काम अखेर झाले सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:09 PM2018-12-11T23:09:42+5:302018-12-11T23:10:09+5:30
अंतर होणार कमी; मार्चला पूर्ण, २२ गावांतील विद्यार्थ्यांची सोय
वाडा : ठाणे व पालघर जिल्ह्यातील भिवंडी व वाडा तालुक्यातील काही गावांना जोडणाºया या तालुक्यातील उचाट या गावाच्या हद्दीत तानसा नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर असून मार्चअखेर तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलामुळे ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यातील अंतर १५ कि.मी.ने कमी होणार असून विशेषत: भिवंडी तालुक्यातील २२ गावांतील मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.
उचाट या गावचे पुनर्वसन १९६२ मध्ये तानसा नदीकाठी झाले. त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अॅस्पी विद्यालयाची स्थापना केली. ती मध्ये पहिली ते बारावीपर्यंत तसेच इंग्लिश मिडीयमची शाळा असून एकूण बाराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे सुमारे ६५० विद्यार्थी हे भिवंडी तालुक्यातील सागाव, एकसाल, कुशापूर, माडोशी, सावरोली, देवचोळा, वापे, दुधणी, चिंचवली, दिघाशी, पाश्चापूर, कुंदे, खंबाळा, वेडवहाळ, बासे, मैंदे, शिरोळा, करमाळा आदी २२ गावांतील आहेत. मात्र तानसा नदीवर पुल नसल्याने पावसाळ्यात या विद्यार्थांना अंबाडी मार्गे कुडूस उचाट असा वळसा देऊन दहा बारा किलोमीटर चा फेरा घेऊन शाळा गाठावी लागत होती. या नदीवर उचाट येथे एक बंधारा असून या बंधा-यावरून विद्यार्थी प्रवास करीत असत. मात्र पावसाळ्यात पुराच्या वेळी या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत असे. या बंधा-यावरून पडून एका विद्यार्थांचा मृत्यूही झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून या नदीवर पुल व्हावा अशी मागणी उचाटवासीय करीत होते.
येत्या फेब्रुवारी/मार्चपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल.
- प्रकाश पातकर, शाखा अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा
येथील पुलाला गेल्या वर्षी मंजूरी मिळून त्याचे काम जानेवारीत सुरू केले आहे. यासाठी २ कोटी दहा लाखांचा निधी मंजूर असून त्याचा ठेका आर. के. सावंत यांना देण्यात आला आहे. नाबार्ड योजनेतून तो मंजूर झाला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे.