वसई महापालिकेवर ठाण्याचा प्रभाव?; निवडणुकीपूर्वीच घडामोडींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:59 PM2020-11-11T23:59:39+5:302020-11-11T23:59:45+5:30
शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक हे ठाण्यातील महत्त्वाचे व मातब्बर नेते आहेत.
विरार : वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीला ५ ते ६ महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वसई-विरार शहर महापालिकेवर ठाण्याचा विशेष प्रभाव जाणवू लागल्याचे दिसून येत आहे. महापालिका काबीज करण्यासाठी हे अदृश्य हात सध्यातरी राबत असल्याची चर्चा वसई-विरारमध्ये आधीपासूनच रंगू लागली आहे. ठाण्याच्या राजकीय वर्तृळातील मातब्बर नेते निवडणुका समोर ठेवून या ठिकाणी लक्ष घालून आहेत. आयुक्त गंगाथरन डी. देखील या ठाणेदारांच्या शब्दाला मान देत असल्याने ही
निवडणुकीची पाऊलवाट सोपी करण्यासाठीची नांदी तर नाही, असे सूर उमटताना दिसून येत आहेत. लॉकडाऊन काळात महापालिका आयुक्तांनी कामावरून कमी केलेल्या अतिक्रमण विभागातील १२७ ठेका कर्मचार्यांना शिवसेनेचे विधान परिषद आमदार तथा पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवीद्र फाटक यांच्या प्रयत्नाने पुन्हा कामावर रुजू करून घेण्यास महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी हिरवा कंदील दर्शविला आहे.
शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक हे ठाण्यातील महत्त्वाचे व मातब्बर नेते आहेत. ते पालघर जिल्हा संपर्कप्रमुख असल्याने आयुक्तांनी त्यांच्या प्रयत्नांना ओ देत १२७ ठेका कर्मचार्यांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यात सध्या विस्तव जात नाही.
बहुजन विकास आघाडीला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपासून बविआच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. चकमकफेम प्रदीप शर्मा यांना आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात मैदानात उतरवून पहिल्यांदाच बविआच्या राजकीय गोटात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेला काही अंशी फलदायीदेखील ठरला. आमदार क्षितीज ठाकूर यांनी या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांचा पराभव केला असला तरी प्रदीप शर्मा यांना मिळालेली मतांची टक्केवारी मोठी होती.
वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल जसजसे वाजू लागले आहे, तसतसे शिवसेनेच्या ठाण्यातील मातब्बर नेत्यांनी वसई-विरारवर प्रामुख्याने लक्ष दिले आहे. आयुक्त गंगाथरन डी. हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले असल्याची चर्चादेखील वसईच्या राजकीय वर्तृळात बर्याचदा रंगताना पाहायला मिळते. बविआच्या प्रत्येक प्रयत्नांना झुकते माप देत ठाण्यातील नेत्यांसाठी मात्र सदा तत्पर असलेल्या आयुक्तांवर ठाण्याचा प्रभाव असल्याचे चर्चा रंगू लागली आहे.