मीरा भाईंदरसाठीच्या २१८ दशलक्ष लीटर सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 03:18 PM2023-06-10T15:18:31+5:302023-06-10T15:18:41+5:30

नागरिकांना पाणी टंचाईतून दिलासा मिळून २४ तास पाण्याचे स्वप्न होणार पूर्ण 

The 218 million liter Surya Water Supply Scheme for Mira Bhayander will be completed in January 2024 | मीरा भाईंदरसाठीच्या २१८ दशलक्ष लीटर सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होणार

मीरा भाईंदरसाठीच्या २१८ दशलक्ष लीटर सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदरकरांना २४ तास पाणी मिळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठीची महत्वाकांक्षी अशी २१८ दशलक्ष लिटरची सूर्या पाणी पुरवठा योजनेची कामे जानेवारी २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय शासनाचा असल्याचे आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी योजनेच्या कामांची पाहणी केल्या नंतर सांगितले .  वन विभागा कडून वन हद्दीत काम करण्याची परवानगी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकर मिळेल अशी ग्वाही देखील आमदारांनी दिली आहे . 

मीरा भाईंदर शहराला महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ कडून १२५ दशलक्ष लिटर तर स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. कडून ८६ दशलक्ष लिटर असा एकूण २११ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मंजूर असल्याचे महापालिका सांगते .  प्रत्यक्षात शहराला रोजचे सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते . सध्याची लोकसंख्या विचारात घेता रोज २१६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना  रोज २६ ते ३१ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळते . आधीच पाणी कमी त्यात विविध कारणांनी पाणी पुरवठा बंद होण्याच्या कारणांनी शहरात पाणी टंचाई भेडसावत आहे . 

मीरा भाईंदरच्या पाणी टंचाईवर कायम स्वरूपी तोडगा असलेली २१८ दशलक्ष लिटरची सूर्या पाणी पुरवठा योजना गेल्या अनेक वर्षां पासून विविध कारणांनी रखडली आहे . सूर्या योजनेला गती देण्यासह शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था योजना पूर्ण करणे आवश्यक आहे . खासदार राजन विचारे , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह महापालिका आयुक्त दिलीप ढोले हे सूर्या व अंतर्गत वितरण व्यवस्था यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत . त्यासाठी अनेक बैठका व पत्रव्यवहार  झाले आहेत . 

सूर्याचे पाणी येण्या आधी मीरा भाईंदर शहरात अंतर्गत जल वाहिन्या, टाक्या आदी वितरण व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याने अमृत योजनेतून ५१६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे . त्याचे काम जून महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे . 

शहराची २०५५ साला पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची गरज विचारात घेऊन सूर्या योजना मंजूर झाली आहे . धामणी (सूर्या) धरण परिसरात सूर्या योजनेच्या उदंचन केंद्र , आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र आदींच्या कामांची पाहणी व आढावा आ.  सरनाईक व आ . गीता जैन यांनी गुरुवारी घेतला . एमएमआरडीएचे सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प प्रमुख अभियांत्रिक सुनील वांडेकर  , कार्यकारी अभियंता हनुमान सोनावणे , उप अभियंता मिलिंद खरे , कुणाल शेंडे, महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे आदी अधिकारी , माजी विरोधीपक्ष नेते धनेश पाटील व राजू भोईर , माजी नगरसेविका वंदना पाटील , संध्या पाटील, नीला सोन्स , माजी नगरसेवक कमलेश भोईर, अश्विन कासोदरिया सह पूजा आमगावकर आदी उपस्थित होते . 

उदंचन केंद्र व जल शुद्धीकरण केंद्राचे काम ९९ टक्के तर १ . ७ किमीचा  मेंढवण खिंड बोगदा पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ४. ५ किमीच्या तुंगारेश्वर बोगदा चे काम सुरु असून ते आगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे. चेणे येथे ४५ दशलक्ष लिटर पाण्याचे जलाशय बांधण्याचे काम ४० टक्के झाले आहे. एकूणच सर्व बांधकाम , जलवाहिनी टाकण्याचे काम , कामाची तपासणी व चाचणी तसेच प्रकल्प कार्यान्वित करण्याची कामे जानेवारी २०२४ पर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले . 

प्रकल्पासाठी आवश्यक १३२ के. व्ही. उच्च दाबाचा विद्युत पुरवठा डहाणू उप केंद्रापासून ते सूर्या नगर आणि कवडास पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. तत्वतः वन विभागाने परवानगी दिली असली तरी वन क्षेत्रात काम करण्याची प्रत्यक्ष परवानगी मिळणे बाकी आहे . याबाबत ऊर्जा मंत्र्यां कडे बैठक घेऊन तात्काळ तोडगा काढणार असल्याचे आ . सरनाईक यांनी सांगितले . 

दोन्ही आमदारांनी योजनेतीची माहिती घेत कामात काही अडथळे वा अडचणी असल्या बाबत अधिकाऱ्यां कडे विचारणा केली . कामांना गती दया व नियोजित वेळे आधी प्रकल्प पूर्ण करून पाणी पुरवठा सुरु करण्यास दोन्ही आमदारांनी सांगितले .  सूर्या योजने मुळे मीरा भाईंदर पाणी टंचाई मुक्त होईलच शिवाय नागरिकांना २४ तास पाणी देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाणार असल्याचे यावेळी आमदारांनी सांगितले . 

Web Title: The 218 million liter Surya Water Supply Scheme for Mira Bhayander will be completed in January 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.