पूर्ववैमनस्यातून सुताराची हत्या करणाऱ्या आरोपीला विरार पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 05:12 PM2024-03-18T17:12:26+5:302024-03-18T17:12:33+5:30
सदरच्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचे कोणतेही धागेदोरे नसतांना आरोपीला अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा - नारंगी कोपरी कच्ची खदान रोडवर ४० वर्षीय सुताराची दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीने ही हत्या पूर्ववैमनस्यातून केल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली आहे. तसेच आरोपीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी असल्याचेही त्यांनी सांगितले.
१५ मार्चला सकाळी कोपरी कच्ची खदान रोडवर दीपक उमेश चव्हाण (४०) याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत सापडला होता. खदान परिसरात स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती विरार पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केल्यावर आरोपीने मयतच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने प्रहार केल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सदर खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनांनुनार विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाची लागलीच वेगवेगची ५ पथके तयार केली होती. पोलिसांनी दीपक राहत असलेला परिसर पिंजून काढला. तपासाच्या सर्व उपाय योजना राबवून मिळवलेल्या माहितीचे आधारे जयराम शंकर आंचेकर (५५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्याने व कौशल्यपूर्वक तपास केल्यावर त्याने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दगडाने ठेचून दिपकला जीवे मारल्याची कबुली दिली. सदरच्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचे कोणतेही धागेदोरे नसतांना आरोपीला अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीव निरीक्षक (प्रशासन) प्रकाश मासाळ, प्रकटीकरण पथकाचे सपोनि ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, संदिप शेळके, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, नामदेव ढोणे व सोहेल शेख यांनी केली आहे.