पूलच वाहून गेला, मुलांचा मुक्काम रात्रभर शाळेतच; राज्याच्या राजधानीजवळील जिल्ह्यात दिव्याखाली अंधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 05:24 AM2023-07-29T05:24:08+5:302023-07-29T05:24:41+5:30
पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात हेदीचापाडा येथील नदीला आलेल्या पुराने पूलच वाहून गेला.
जव्हार : पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात हेदीचापाडा येथील नदीला आलेल्या पुराने पूलच वाहून गेला. त्यामुळे हेदीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील ५८ विद्यार्थ्यांना रात्री शाळेतच मुक्काम करण्याची वेळ आली. जव्हारमधील शाळांना सुट्टी नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे हाल झाले.
पावसाने पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच थांबावे लागले. गुरुवारी विद्यार्थ्यांना घरी जाता न आल्याने पर्यायी म्हणून शालेय शिक्षण समिती व शिक्षकांनी मुलांना रात्रीचे जेवण देऊन शाळेतच झोपण्याची व्यवस्था करून दिली. शिक्षकही शाळेतच थांबले होते. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यावर वाहून गेलेल्या पुलाच्या मार्गावरून नदीमधून मुलांना घरी सोडण्यात आले. रस्ता पूर्ववत होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत येण्यासाठी नदीतून धोकादायकपणे प्रवास करावा लागणार आहे.
जव्हार तालुक्यातील शिरोशी तळ्याचापाडा पुलावरून पाणी जात असल्यामुळे ३० ते ४० विद्यार्थी व शेतकरी गुरुवारी दुपारपासून अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी जीव धोक्यात टाकून मुलांना खांद्यावरून नदी पार करून घरी आणले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक पाड्यांचा संपर्क तुटला होता.