‘त्या’ महिलेसाठी डॉक्टर ठरले देवदूत; सर्पदंश झाल्याने सुरू होते उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:32 AM2024-04-22T10:32:56+5:302024-04-22T10:33:15+5:30
ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश दुम्पलवार व डॉ. नम्रता निकोले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ महिला रुग्णावर उपचार सुरू केले.
पालघर : खारेकुरण येथील सर्पदंश झालेल्या एका महिलेला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तिची अत्यवस्थ स्थिती पाहून उपस्थित दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत तत्काळ रुग्णाला सीपीआर व श्वासनलिकेत ट्यूब टाकून तिचा श्वासोच्छवास पूर्ववत केला. तिच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून तिला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याने डॉक्टर हेच खरे देवदूत असल्याची प्रचिती आली, अशी प्रतिक्रिया त्या महिलेचे नातेवाईक वि.रा.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
खारेकुरण येथील महिलेला शनिवारी दुपारी सर्पदंश झाला. अर्ध्या तासानंतर ही बाब कळल्यावर तिला अत्यवस्थ स्थितीत यदुनाथ पाटील यांनी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तिच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश दुम्पलवार व डॉ. नम्रता निकोले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ महिला रुग्णावर उपचार सुरू केले. सर्पदंशावरील प्रतिजैविके तत्काळ सुरू करून तिचा श्वास पूर्ववत सुरू करून दिला.
त्यानंतर १०८ ॲम्ब्युलन्ससोबत डॉक्टर देऊन आयसीयु उपलब्ध हॉस्पिटलला पूर्वसूचना देऊन तिला पाठवले. तेथे तिला रात्रभर व्हेंटिलेटरवर ठेवले. आता तिच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पालघर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि अन्य स्टाफने दाखवलेली तत्परता व आधुनिक चिकित्सा पद्धतीमुळे तिचा जीव वाचल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेकडे एकही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना अनेकदा गुजरात, सिलवासा गाठावे लागते. पालघर रुग्णालयात रुग्णाबाबत एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर नातेवाईकांच्या रोषाला वैद्यकीय अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. - वि.रा.पाटील, ग्रामस्थ