पॅसेंजर गाडीचे इंजिन अचानक वेगळे झाले, अन् प्रवाशांच्या काळजात धस्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 12:03 PM2023-10-01T12:03:42+5:302023-10-01T12:03:50+5:30
काही अंतरावरच वैतरणा खाडी पूल होता; मात्र त्यापूर्वी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला, असे प्रवाशांनी सांगितले.
हितेन नाईक
पालघर/सफाळे : पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकातून पालघरकडे जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद पॅसेंजर धावत्या गाडीचे इंजिन अचानक वेगळे झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. यानंतर ट्रॅकमधून जाणाऱ्या प्रवाशांनी एकच आरडाओरडा केल्याने इंजिन चालकाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांने गाडीचे इंजिन थांबवले. काही अंतरावरच वैतरणा खाडी पूल होता; मात्र त्यापूर्वी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला, असे प्रवाशांनी सांगितले.
मुंबई येथून दुपारी १:४० वाजून सुटणारी ही पॅसेंजर दुपारी २ वाजून १० मिनिटांनी वैतरणा स्थानकात थांबली. या ट्रेनमधून प्रवासी उतरल्यानंतर ही ट्रेन पुढे सफाळ्याच्या दिशेने निघाली, पॅसेंजरचे इंजिन आणि प्रवासी डब्याला जोडणारी लोखंडी कपलिंग तुटली आणि डब्यांना मागे सोडून हे इंजिन पुढे अनेक मिटर पुढे गेले.
... आणि ट्रेन निघाली
इंजिन चालकाने आपले इंजिन मागे घेऊन लोखंडी कपलिंगची दुरुस्ती केल्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर ही ट्रेन रवाना झाली.
वैतरणा स्थानकातून वाढीव गावाच्या दिशेने रेल्वे ट्रॅकमधून जाणाऱ्या प्रवाशांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी ओरडून इंजिन चालकाच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली.
या घटनेमुळे सुमारे अर्धा तास गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती.
ही ट्रेन वैतरणा पुलावरून जाताना हा अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती.
ही ट्रेन बोरीवलीवरून सुटल्यानंतर काहीतरी तुटल्यासारखा आवाज येत असल्याचे एका प्रवाशाने ‘लोकमत’ला सांगितले.