पतीचे निधन, आर्थिक चणचण व ३ मुलांच्या विवंचनेत असणाऱ्या आईने संपवलं जीवन
By धीरज परब | Published: January 30, 2023 07:42 PM2023-01-30T19:42:07+5:302023-01-30T19:43:03+5:30
पतीचे निधन, आर्थिक चणचण व ३ मुलांच्या विवंचनेत असणाऱ्या आईने आत्महत्या केली.
मीरारोड : पतीच्या निधना मुळे ३ मुलांची आलेली जबाबदारी व सुरू केलेल्या व्यवसायात न मिळणारा प्रतिसाद या मुळे तणावात असणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे.
भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क मध्ये राहणाऱ्या सपना हितेश मिस्त्री ( वय ३७ ) ह्या महिलेने शनिवारी रात्री राहत्या घरात दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नवघर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना चे पती हितेश यांचे चार महिन्या पूर्वी म्हणजे गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी हृदय विकाराने निधन झाले होते. १७ वर्षांची सुहानी, ८ वर्षांची दिव्या व ६ वर्षांचा मोहित अशी तीन मुलं असल्याने त्यांची जबाबदारी सपना वर आली होती.
दिड महिन्या पूर्वी घरा जवळच्या इमारतीत तिने दुकान भाड्याने घेऊन फास्ट फूड व्यवसाय सुरू केला होता. पती हितेशच्या नावाने तिने सुरू केलेल्या हितुज फास्टफूड ला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आर्थिक चणचण व तीन मुलांचे भवितव्य ह्या मुळे ती चिंतेत होती. त्यातूनच तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान चार महिन्या पूर्वी वडील आणि आता आई गेल्याने तिन्ही मुलं पोरकी झाली आहेत. तिघांना त्यांच्या कांदिवली येथील काकाने आपल्या घरी नेले आहे.