अनधिकृत इमारत असल्याचे माहिती असताना सदनिका दुसऱ्याला विकणाऱ्यास अटक
By धीरज परब | Published: February 23, 2023 06:10 PM2023-02-23T18:10:41+5:302023-02-23T18:11:21+5:30
अनधिकृत इमारत असल्याचे माहिती असताना सदनिका दुसऱ्याला विकणाऱ्यास अटक करण्यात आली.
मीरारोड : स्वतःची सदनिका असलेली इमारत अनधिकृत असल्याची माहिती असून देखील बनावट पालिका बांधकाम नकाशा देऊन त्याची विक्री करून खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यास नवघर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने अनधिकृत इमारतीं मधील सदनिका खरेदी - विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
भाईंदर पूर्वेच्या गोडदेव भागात हंसा बी ह्या इमारतीत मनीष व ज्योती भाटकर दाम्पत्याची सदनिका २०१४ सालात परेश व काजल नाईक ह्या दाम्पत्याने ३२ लाखांना नोंदणी करारनाम्याने खरेदी केली होती . सदर सदनिका खरेदीसाठी नाईक दाम्पत्याने बँकेतून २४ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते . गृहकर्ज साठी आवश्यक इमारतीचा मंजूर बांधकाम नकाशा व प्रारंभपत्र , भोगवटा प्रमाणपत्र , सदनिका खरेदी - विक्रीचे आधीचे मूळ करारनामे भाटकर यांनी दिल्यावर ती कागदपत्रे नाईक यांनी बँकेत दिली होती. मंजूर नकाशा स्पष्ट नसल्याने बँकेने दुसरी प्रत मागितली असता भाटकर यांनी नाईक यांना दुसरी प्रत दिल्यावर बँकेने गृहकर्ज मंजूर केले.
मात्र सदर इमारत २०१२ सालीच महापालिकेने अनधिकृत घोषित केली होती . ऑक्टोबर २०१६ मध्ये महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याने इमारतीतील सदनिकाधारकांना त्यांच्या कडील इमारतीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता सदनिका धारकांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले . विकासक विजय पाटील यांनी सदर बनावट कागदपत्रे बनवून सदनिका विकून लोकांची फसवणूक केल्या प्रकरणी रहिवासी वैशाली सचदेव यांच्या फिर्यादी वरून पाटील यांच्यावर २०१७ साली नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पालिकेने इमारत तोडण्याची कार्यवाही प्रस्तावित केल्याने रहिवाश्यानी ठाणे न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली. नाईक दाम्पत्याने माहिती घेतली असता २०१२ साली मनीष भाटकर हे हंसा बी सोसायटीचे सचिव असतानाच इमारत अनधिकृत असल्याची नोटीस आली होती. त्यावेळी सोसायटीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतील कागदपत्रात अन्य रहिवाश्यांसह भाटकर यांची सुद्धा स्वाक्षरी होती.
मनीष व ज्योती भाटकर यांना ते रहात असलेली इमारत अनधिकृत असल्याची माहिती असून देखील बनावट बांधकाम नकाशा आदी देऊन आपली फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्याची तक्रार काजल नाईक यांनी केली होती . गेल्यावर्षी एप्रिल मध्ये मनीष व ज्योती वर गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र भाटकर दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली होती . तसेच सदनिका परत घेऊन ठराविक रक्कम नाईक याना देण्याची तयारी भाटकर दाम्पत्याने दर्शवली होती. मात्र ते देत असलेली रक्कम कमी असल्याने नाईक यांनी नकार दिला.
बुधवारी मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने मनीष भाटकर याला नवघर पोलिसांनी अटक केली. तर ज्योतीला अटके पासून दिलासा मिळाला आहे. सहायक निरीक्षक योगेश काळे हे पुढील तपास करत आहेत. इमारतीतील अन्य काही रहिवाश्यांच्या देखील अश्याच प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार आहे.