घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक; दोन गुन्ह्यांची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 07:02 PM2023-08-25T19:02:07+5:302023-08-25T19:02:11+5:30
चोरीच्या देवांच्या मुर्त्या केल्या हस्तगत
मंगेश कराळे
नालासोपारा :- घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आचोळ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेल्या देवाच्या दोन चांदीच्या मूर्ती, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आचोळे गणपती मंदिरा जवळील न्यू अजय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अशोक रेछोडभाई वालंड (५५) यांच्या घरी १३ जुलैला रात्री चोरट्यानी रुमचे लॉक तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातील रोख रक्कम, देवांच्या चांदीच्या मुर्त्या, पितळी समई, पासपोर्ट असा १७ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. आचोळे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. वसई नालासोपारा परिसरात तसेच आचोळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने व सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे चोरट्याचा शोध घेत होते.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी सोनु बटला उर्फ शोएब साहिबअली राईन (१९) याला जायका हॉटेल येथुन ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केल्यावर सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून दोन चांदीची मुर्ती त्यामध्ये गणपती व महालक्ष्मी देवीची मुर्ती, एक पितळी समई व ४ वेगवेळ्या कंपनीचे मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच आचोळे येथील दोन गुन्हे उघडकीस आणले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक सोनवणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुहास म्हात्रे, पोलीस हवालदार दत्तात्रय दाईंगडे, शंकर शिंदे, निखील चव्हाण, विनायक कचरे, आमोल सांगळे, मोहनदास बंडगर, मोहन पाईकराव यांनी केली आहे.