समुद्रकिनारी सुरुच्या बागेतील शकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी, मोठं नुकसानं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:48 PM2022-03-03T23:48:50+5:302022-03-03T23:49:30+5:30
पर्यावरणाचा ऱ्हास ; आग लावली की लागली ?
वसई :- आशिष राणे,वसई
वसई गावातील समुद्रकिनारी सुरूची बाग परिसरातील शेकडो सुरूच्या झाडांना अचानकपणे आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत शेकडो सुरूची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी आली असून यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेलं नाही. मात्र, शेकडो झाडे जळून गेल्यानं पर्यावरणाचं मोठं नुकसान झाले आहे
अधिक माहितीनुसार गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास वसई गावातील पाचूबंदर -भास्कर आळी येथील मागील भागात वसई समुद्र किनारा असून याचठिकणी हजारो सुरूची झाडे डौलाने उभी असून हे ठिकाण म्हणजे हौशी पर्यटकांची पर्वणी आहे. मात्र, याच ठिकाणी अचानकपणे शेकडो झाडांना रात्रीच्या अंधारात आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या जवानांना समजल्यावर अग्निशमन व वसई पोलिसांनी घटनास्थळ गाठले. खास करून हा परिसर बहुतांश तिवरांची झाडे, चिखल व दलदलीच्या क्षेत्रात मोडत असल्याने समुद्रकिनाऱ्यावरील त्या सुरुच्या झाडापर्यंत पोहोचणं अग्निशमन दलाच्या जवानांना कठीण झाले होते. तरीही रात्री उशिरा पर्यंत तेथील आग विझविण्याचे वसई विरार महापालिका अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरूच होते.
दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली किंवा कोणी मुद्दाम लावली का, याचा देखील शोध घेण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. परिणामी याठिकाणी दिवसभर व सायंकाळी ही पिकनिक किंवा काही तरुण व उपद्रव करणारी मंडळी मद्यपान सिगारेट मादक पदार्थांचे सेवन सर्रास करीत असतात. परंतु कदाचित कोणी मुदामून अशा प्रकारे झाडांना व तिवरांना इजा पोहचण्यासाठी काही गैर कृत्य तर केलं नाही ना, याचाही तपास होणं गरजेचं आहे. एकूणच वसई सुरुची बाग संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी आल्यामुळे शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर वसईतील पर्यावरण प्रेमींनी मोठी चिंता व्यक्त केली आहे