राज्यपाल, जिल्हाधिकाऱ्यांचे दौरे संपले; महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 12:42 PM2024-07-27T12:42:00+5:302024-07-27T12:44:51+5:30
महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतूककोंडीचे रडगाणे कायम आहे.
सुनील घरत
पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम, वाढती वाहतूककोंडी, माती भराव याबाबत अलीकडेच पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांनी महामार्गाचा घोडबंदर ते डहाणू असा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगोलग राज्यपाल रमेश बैस यांनी पालघर दौरा केला, मात्र त्यानंतरही महामार्गावरील मालजीपाडा ते चिंचोटी या दरम्यान खराब रस्त्यामुळे वाहतूककोंडी कायम असल्याने ती सुटणार तरी कधी? असा प्रश्न वाहनचालक व प्रवासी यांना पडला आहे.
महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतूककोंडीचे रडगाणे कायम आहे. जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके व राज्यपालांनी पालघरचा दौरा केल्यानंतर सुरक्षा म्हणून वाहतुककोंडीची समस्या दोन दिवस निवळली होती, मात्र हे दौरे संपल्यानंतर पुन्हा एकदा महामार्गावर वाहतूककोंडीचे रडगाणे कायम सुरू झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गावरील समस्यांचा आढावा घेतल्यानंतर महामार्गावर खड्डे भराव मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र या खड्डे भराव मोहिमेत केवळ खड्डे बुजवण्याची थुकपट्टी सुरू आहे. महामार्गावरून वसई-विरारपासून घोडबंदर गाठण्यासाठी किमान 2 तास लागतात. त्यात पावसाची संततधार असेल तर कोंडीत आणखीच वाढ होते. या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चाकरमानी व वाहतुकदार अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.