धक्कादायक! पत्नीनेच दिली पतीच्या हत्येसाठी एक लाखांची सुपारी; आरोपींना पोलिसांनी ४८ तासात केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 06:32 PM2023-02-01T18:32:55+5:302023-02-01T18:33:07+5:30
पत्नीनेच पतीच्या हत्येची १ लाखांची सुपारी देणाऱ्या पत्नीसह तीन आरोपींना ४८ तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) - पत्नीनेच पतीच्या हत्येची १ लाखांची सुपारी देणाऱ्या पत्नीसह तीन आरोपींना ४८ तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पण ही नेमकी हत्या कोणत्या कारणांमुळे व का झाली याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. सदर हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची चर्चा असल्याने पोलीस त्याच दृष्टीने तपास करत आहे.
२७ जानेवारीला संध्याकाळी नायगाव रिक्षा स्टँड जवळील ब्रिजखाली खाडीच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. वालीव पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केल्यावर मृत व्यक्तीची धारदार हत्याराने मानेवर व डोक्यावर वार करून हत्या करत मृतदेह त्या ठिकाणी टाकला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. रविवारी वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
खुनाचा गुन्हा केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खाडीच्या पाण्यात फेकुन दिल्याने फुगलेल्या, कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मयताची ओळख पटविणे. आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांनी वेगवेगळी पाच पथके तयार केली. पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील मनुष्य मिसींग रजिस्टर चेक केले. त्यादरम्यान काहीही माहिती प्राप्त न झाल्याने मुंबई, ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत असलेल्या पोलीस ठाण्यातील मनुष्य मिसिंग रजिस्टर चेक केले. यातील मयताने अंगावर परिधान केलेल्या कपडयांचे वर्णन मुंबईतील बांगुरनगर पोलीस ठाण्यात मनुष्य मिसींग व्यक्तीच्या कपडयाशी जुळले. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेवुन त्याचे नाव कमरुददीन मोहम्मद उस्मान अन्सारी (३५) हे असल्याचे निष्पन्न केले.
गोरेगाव येथे राहणाऱ्या कमरुद्दीन रहात असलेल्या परिसरात जावून चौकशी केली. शेजारी राहणारे आरोपी बिलाल उर्फ मुल्ला पठाण (४०), त्याची पत्नी सौफिया पठाण (२८) हे घटना घडल्यापासुन परिसरातुन निघून गेल्याची माहिती मिळाली. ते गुजरातच्या वापी येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यांना त्या ठिकाणावरुन ताब्यात घेऊन विश्वासात त्यांचेकडे सखोल चौकशी केल्यावर त्यांनी पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. तसेच पतीच्या हत्येसाठी प्रेरणा देणारी त्याची पत्नी आशिया अन्सारी हिला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे यांनी केली आहे.