नालासोपाऱ्यात दोन बंगल्यांत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 11:43 PM2019-12-25T23:43:26+5:302019-12-25T23:43:32+5:30

गुन्हा दाखल : नऊ लाखांचा ऐवज लंपास; मिस्सासाठी बाहेर गेले असताना डल्ला

Theft in two bungalows in Nalasopara | नालासोपाऱ्यात दोन बंगल्यांत चोरी

नालासोपाऱ्यात दोन बंगल्यांत चोरी

Next

नालासोपारा : पश्चिमेकडील नवाळे गावातील रस्त्यावरील दोन बंगल्यांमध्ये कोणी नसताना मोठी चोरी झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गावातील सर्व मंडळी मिस्सासाठी चर्चमध्ये गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दोन बंगले फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मिस्सानंतर पुन्हा घरी आल्यानंतर हा प्रकार सराई कुटुंबियांच्या लक्षात आला. नालासोपारा पोलिसांनी चोरांविरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मंगळवारी रात्री प्रभू येशूचा जन्मोत्सव वसई तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू होता. नालासोपारा शहराच्या पश्चिमेकडील नवाळे गावातील रस्त्यावर उच्चभ्रू वस्तीतील अकाऊंटट संजाव सिल्व्हेस्टर सराई (५६) यांचा ‘सानसी’ आणि त्यांचेच नातेवाईक वैलिरीयन अंतोन सराई यांचा ‘आशीर्वाद’ असे दोन बंगले आहेत. या दोन्ही बंगल्यातील मंडळी मंगळवारी रात्री साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान मिस्सासाठी गोम्सआळीमधील चर्चमध्ये गेली होती. तीच नेमकी वेळ साधत चोरांनी मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटातून लाखो रु पयांचे सोने, अंगठी, बांगड्या, हार, मंगळसूत्र आणि रोख रक्कम चोरून नेली. सानसी बंगल्यातून ५ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल तर आशीर्वाद बंगल्यातून ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल असा एकूण ९ लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
सराई कुटूंब चर्चमधील सोहळा आटोपून घरी परतल्यावर घरफोडी झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीने घडलेल्या चोरीची माहिती पोलिसांना दिली. नालासोपारा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरणच्या टीमने पंचनामा केला असून फिंगर प्रिंट आणि श्वानपथकांना घटनास्थळी काही पुरावा मिळतो का यासाठी पाचारण केले आहे. नवाळे गावातही पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हे चोर माहितीगार असावेत, असा पोलिसांना संशय आहे. सराई कुटुंबात पुढच्या रविवारी लग्न असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घरी आणून ठेवल्याचे सूत्रांकडून कळते.

या दोन्ही बंगल्यात चोरी झाल्याची तक्र ार आल्याने दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या बंगल्याला असलेले सीसीटीव्हीचे फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असून काही पुरावा मिळतो का याचाही शोध घेत आहे.
- वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

Web Title: Theft in two bungalows in Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.