मृत्यूनंतर १४ दिवस उलटूनही अहवाल नाही; मृताला कोरोना नसल्याचा भावाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:56 AM2020-07-01T00:56:11+5:302020-07-01T00:56:22+5:30
पालघर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
मनोर : मनोर येथील एका व्यक्तीला सर्दी आणि श्वासाचा त्रास होत असल्याने पालघर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्याचे स्वॅब मुंबईला पाठवले. मात्र, अहवाल वेळेत न आल्याने या रुग्णाची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला. आता १४ दिवस उलटूनही अहवाल मिळाला नाही. रुग्णाला कोरोना नव्हताच. अहवालाच्या प्रतीक्षेत उपचारांअभावी त्याला प्राण गमवावे लागल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे.
१५ जूनला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र २० जूनपर्यंत अहवाल आलाच नाही. या काळात रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. २१ जूनला नातेवाइकांनी त्याला नालासोपाराच्या विनायका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. संध्याकाळी त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. पालघर ग्रामीण रुग्णालयाचा अहवाल लवकर मिळाला असता तर रुग्णावर उपचार सुरू झाले असते. पाच दिवस अहवालासाठी ताटकळत ठेवल्यानेच त्याचा मृत्यू झाला. आता १४ दिवस उलटले तरी अहवाल आलेला नाही. कोरोना नसतानाही केवळ उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या भावाने केला आहे.
संबंधित रुग्णाचा रिपोर्ट आला असेल तर आम्ही ते सांगू शकत नाही. तो गोपनीय ठेवावा लागतो. तो जाहीर करता येईल अथवा नाही, हे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच सांगता येईल. - डॉ. कांचन वानिरे, सिव्हिल सर्जन, ग्रामीण रु ग्णालय, पालघर