खडखडचे ठेकेदार आले जात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:39 AM2018-04-24T00:39:46+5:302018-04-24T00:39:46+5:30
या धरणावर टप्प्या टप्याने झालेला खर्च मिळनू तो १३२ कोटींवर जावूनही गळती थांबत नसल्याने ठेकेदारांना जात्यात आले आहेत.
हुसेन मेमन।
जव्हार : शहर व आसपासचा ग्रामिण भाग दरवर्षी पाण्याच्या टंचाईचा सामना करत असून यंदाची पाणीबाणी जास्त जाणवणारी आहे. या परिस्थितीमध्ये तालुक्यातील आधार असणाऱ्या खडखड डोमिहीरा धरण जागो जागी पाझरत असल्याने त्यावर खर्च झालेले ७३ कोटी मातीमोल झाले आहेत. त्यातच सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणावर टप्प्या टप्याने झालेला खर्च मिळनू तो १३२ कोटींवर जावूनही गळती थांबत नसल्याने ठेकेदारांना जात्यात आले आहेत.
जव्हारमध्ये दरवर्षी विक्रमी पाऊस होता तरी आज ही तालुक्यातील आदीवासी पाड्यांवर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाळ्यात नेहमी पाणी टंचाई भासत असते. यामुळे शासनाकडून दरवर्षी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून विहिर, बंधारे, नळ-पाणी योजना तयार होत असतात. येथील खडखड या गावातील डोमिहीरा नावाने नदीवर आदीवासी उपाय योजने अंतर्गत २००५ मध्ये ७३ कोटी रुपये खर्च करून शासनाने धरण बांधले.
हा धरण २०१२ मध्ये ९५ टक्के पूर्ण झाले. मात्र, धरणाचे बांधकाम अनेक ठिकाणी निकृष्ट असल्याने तो पाझरु लागला. यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले. याला जलसंपदा विभागाचे अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. त्यांच्या संगमतानेच निकृष्ट काम करण्यात आलेले असल्याचा आरोपही येथील आदिवासी समाजाने केला आहे. तो पाझरत असल्यामुळे रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे.
खडखड डॅम पासून ७ किमी अंतरावर असणाºया जव्हार शहराला या धरणातून १.२८ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र जव्हार नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे शहराला मंजूर पाणी आरक्षण रद्द करण्यात आले असल्याचे पत्र कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांनी प्रधान सचिव, जलसंपदा विभागाल, मंत्रालय मुबंई यांना कळविले आहे.
या प्रकरणी कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. टी. प्रभाकर यांनी खडखड धरणाच्या निकृष्ट कामाला जबाबदार दोषी अधिकाºयावर कारवाई होणार आहे असून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय त्याच्याकडून १३२ कोटी रुपये नुकसान भरपाई वसून केली जाणार असल्याचे सांगितले आहे. दोषींवर कारवाई करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे, चौकशी अधिकारी कोकण भवन हे या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
चौकशी सुरु आहे...
दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यासाठी प्रादेशिक चौकशी अधिकारी यांच्या यांच्या मार्फत चौकशी सुरू आहे.
- आर. टी. प्रभाकर, कार्यकारी अभियंता,
कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे.
सरकारचा १३२ कोटी रुपये खर्च पाण्यात गेला, २०१४ पासून चौकशी सुरू आहे. अजून दोषींवर कारवाई झालेली नाही. डॅम लीक नसता तर तालुक्याचं पाणी प्रश्न मिटला असता,वीज निर्मिती झाली असती.
- पारस सहाणे, तक्रारकर्ता, जव्हार