चैत्र व पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:50 PM2018-12-31T23:50:41+5:302018-12-31T23:51:06+5:30
या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्याच्या झळा आगामी लग्नसराईला बसण्याची दाट शक्यता असल्याने एरवी वर्ज्य असलेल्या चैत्र आणि पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर दिला जात आहे.
- अनिरुद्ध पाटील।
बोर्डी : या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्याच्या झळा आगामी लग्नसराईला बसण्याची दाट शक्यता असल्याने एरवी वर्ज्य असलेल्या चैत्र आणि पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर दिला जात आहे.
या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्र झळ बसणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह भाजीपाल्याच्या किंमतीही वाढणार आहेत. शिवाय उन्हाचा पारा वाढून असह्य उकाड्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याचा परिमाण लग्नसराईवर होतो आहे. या समस्येवर मार्ग काढण्याकरिता मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे सोहळे उरकून घेण्यास लग्नाळू प्राधान्य देत आहेत. त्यादृष्टीने पुरोहितांकडे लग्नाचे मुहूर्त मागितले जात आहेत. आजही पौष आणि चैत्र या महिन्यात लग्नविधी न करण्याची मानसिकता आहे. परंतु हे शुभाशुभ पाळण्याची आवश्यकता नसून दाते पंचांगात हे सोहळे करण्याचे सांगण्यात आल्याची माहिती आगर येथील पुरोहित धनंजय पंडीत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तर प्रत्येक महिन्यात लग्नाचे मुहूर्त असून या दोन्ही महिन्यात लग्नविधी पार पाडून घेतल्यास होणारी धावपळ कमी होईल. शिवाय मंडपवाले, बेंजो, कटरर्स, लग्नहॉल आणि आप्तेष्टांची होणारी धावपळ कमी होईल असेही ते म्हणाले. त्यामुळे मार्च पूर्वीच हे सोहळे उरकण्याची धावपळ सुरू आहे.