तपासणीच नाही, तर कोरोना कसा रोखणार? बसस्थानक रेल्वेस्थानक, जिल्हासीमेवर बेफिकिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 08:18 AM2021-03-19T08:18:29+5:302021-03-19T08:20:58+5:30
सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी प्रवाशांची कोणतीच तपासणी सध्या तरी होत नाही. बाहेरून येणारे प्रवासी कोरोनाचे कारण ठरणार असल्याने नियम पाळणाऱ्या नागरिकांकडून थर्मल चाचणीची मागणी केली जात आहे. रेल्वे स्थानके, एस. टी. स्थानके, रिक्षा-टॅक्सी स्टँड अशा सर्वच ठिकाणी स्थिती सारखीच आहे.
पालघर : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून, प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासन सजग असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि जिल्हासीमा या ठिकाणी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असल्याची स्थिती आहे. या महत्त्वाच्या तीनही ठिकाणी कोणतीही तपासणी होत नसल्याने कोरोना कसा रोखणार, असा सवाल केला जात आहे.
सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी प्रवाशांची कोणतीच तपासणी सध्या तरी होत नाही. बाहेरून येणारे प्रवासी कोरोनाचे कारण ठरणार असल्याने नियम पाळणाऱ्या नागरिकांकडून थर्मल चाचणीची मागणी केली जात आहे. रेल्वे स्थानके, एस. टी. स्थानके, रिक्षा-टॅक्सी स्टँड अशा सर्वच ठिकाणी स्थिती सारखीच आहे. कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्यांकडून कोरोना रोखणाऱ्या नियमांचे पालन होत नाही. मास्क वापरण्याबाबत सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे, तरीदेखील प्रवाशांकडून नियमांचे पालन होत नाही, असे दिसून येत आहे.
जिल्ह्यात गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरयाणा इत्यादी राज्यांतून येणाऱ्या रेल्वेगाड्या विरार, पालघर, डहाणू या रेल्वे स्थानकावर थांबतात. पण, आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही या प्रवाशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने परराज्यातून येणारे प्रवासी कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता -
संपूर्ण राज्यातच कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना पालघर जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने यंत्रणांनी सावध होण्याची गरज आहे. लॉकडाऊनमधील नुकसान भरून काढणे आणि आर्थिक अडचणीतून बाहेर येणे, यासाठी सर्वच क्षेत्रांतील व्यवहार सुरू झाले आहेत. अशातच पुन्हा लॉकडाऊन केल्यास उभारी घेत असलेले क्षेत्र डबघाईला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. थर्मल चाचणी, गर्दी विभागणी, मास्क न वापरणाऱ्यांना दंड आणि वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई या पद्धतीने वचक ठेवावा. थर्मल चाचणी सुरू केल्यास लक्षणे असलेल्या प्रवाशांचे तातडीने विलगीकरण करणे शक्य होईल. संभाव्य कोरोना रुग्णांवरदेखील नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. यामुळे जिल्ह्यात विविध राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची पुन्हा एकदा सर्व रेल्वे स्थानकांवर थर्मल चाचणीद्वारे तपासणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
एसटी डेपोंमध्ये तपासणीची व्यवस्था नाही
- पालघर जिल्ह्यात एस.टी. डेपोत लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यांचे नाव, नंबर, घेण्याबाबत विभागांतर्गत असलेल्या आठही आगारात व्यवस्था उभारण्यात आली नसून, प्रवाशांना क्वारंटाईन करण्याबाबत कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
- याबाबत आम्हाला कुठल्याही सूचना नसल्याचे चालक आणि वाहकांनी सांगितले. अनेक प्रवासी हे विनामास्क एस.टी.त प्रवेश करतात. परंतु एस. टी.त बसल्यावर जवळचा एखादा फडका, हातरुमाल नाकावर लावण्याच्या सूचना आम्ही देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकांतील थर्मल चाचणी बंद
- वसई, विरार, नालासोपारा या शहरांध्ये गेल्या दोन दिवसांत
१११ कोरोना रुग्ण सापडल्याने रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे या ठिकाणी किमान थर्मल चाचणी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
- या शहरांत परराज्यातून रोज हजारो प्रवासी येत असल्याने त्यांचीही कोरोना चाचणी व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. महापालिकेकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची थर्मल चाचणी करण्यात येत होती. मात्र, ती अचानक बंद करण्यात आली आहे.
सीमेवर परराज्यातील प्रवाशांची नोंद नाही
- महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या सीमेवर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची नोंद अथवा तपासणी होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. राज्याच्या सीमेवर असलेल्या तलासरी येथील दापचरी सीमा नाक्यावर कोरोनाच्या काळात गुजरात, राज्यस्थान राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती.
- सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असताना गुजरात, राज्यस्थान राज्यातून लक्झरी बसेस भरभरून महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. दरम्यान, परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व नोंद करण्याबाबत अजून निर्देश आलेले नाहीत, असे तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी सांगितले.