वाड्यात सीएनजीपंप नसल्याने ३० किमीचा हेलपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:28 AM2019-10-11T05:28:14+5:302019-10-11T05:28:33+5:30
वाडा तालुक्यात सीनएजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत.
वाडा : वाडा तालुक्यात सीएनजी गॅस पंप नसल्याने तालुक्यातील शेकडो वाहन चालकांना गाडीमध्ये सीएनजी भरायला भिवंडी येथे तब्बल ३० किलोमीटर अंतरावर जावे लागते. यामुळे वाहन चालकांचे आर्थिक नुकसान तसेच वेळेचा अपव्यय होत असल्याने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करावा, अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
वाडा तालुक्यात सीनएजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. सरकारने काही गाड्या सीएनजीवर सक्तीने केल्या आहेत. मात्र, तालुक्यात सीएनजी पंप नसल्याने या गाड्यांना सीएनजी भरण्यासाठी भिंवडी येथे जावे लागते. भिवंडी शिवाय दुसरा सीएनजी पंप नसल्यामुळे वाहन चालक, मालकांची प्रचंड गैरसोय होते. ३० ते ४० किलोमीटर अंतरावर भिवंडी गाव असल्याने वाहन चालकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. त्यातच दीड ते दोन तास या प्रवासात जात असल्याने वेळेचाही अपव्यय होत असल्याचे चालकांनी सांगितले.
भिंवडी येथे जाताना शेलार येथे दररोज वाहतूक कोंडी असते. प्रथम या कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतो. त्यानंतर सीएनजी पंपावर रांग लावावी लागते. त्यात त्यांचा पाऊण ते एक तास जातो. त्यामुळे चालक अक्षरश: हैराण होतात. त्यातच भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची दुरवस्था झाली असून यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
तालुक्यातील कुडूस-अंबाडी, कुडूस-कोंढले, कुडूस-उचाट, कुडूस-देवघर, कुडूस-नारे वडवली, कुडूस-वाडा, कुडूस-खानिवली, वाडा-अघई, वाडा-मस्तान, वाडा-विक्र मगड, वाडा-परळी, खानिवली-कंचाड गोºहे, अंबाडी-चांबळे, लोहोपे, अकलोली-केळठण, गणेशपुरी-निंबवली, गोराड, खानिवली-कंळभई असनस, वाडा-कळंभे, सोनाळे आदी अनेक मार्गावर सीएनजीवर चालणाºया गाड्या प्रवाशांची वाहतूक करीत असतात. एकदा सीएनजी भरल्यानंतर तो दोन दिवस पुरतो त्यानंतर पुन्हा तिसºया दिवशी सीएनजी भरण्यासाठी जावे लागते. बाहेरचे भाडे घेतले तर एका दिवसातही सीएनजी संपतो असे चालक म्हणतात. तसेच सीएनजीची टाकी अतिशय छोटी असल्याने त्यात दोन ते तीन किलोच सीएनजी बसतो.
सीएनजी पंप वाडा तालुक्यात किंवा अंबाडी परिसरात नसल्याने आम्हा रिक्षावाल्यांची फारच गैरसोय होत आहे. सीएनजी भरायला आम्हाला पहाटे पाच वाजता उठून भिवंडी येथे जावे लागते. तेव्हाही रांगा लागलेल्या असतात. पंपावर वीज नसल्यास किंवा गॅस नसल्यास तासन्तास वाट पहावी लागते. यामध्ये आमचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच वेळेचाही अपव्यय होत आहे.त्यासाठी शासनाने वाडा तालुक्यात सीएनजी पंप सुरू करावा.
- मालजी वाडू, रिक्षा मालक
सीएनजी गॅसची सोय वाड्यात नसल्याने आम्हा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर सीएनजी पंप तालुक्यात सुरू करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन छेडून प्रशासन व सरकारचे लक्ष वेधावे लागेल .
- शुभम गायकर, ईको मालक