भ्रष्टाचार अजिबात थारा नाही , मुख्यमंत्र्यांनी सुनावल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:48 AM2017-09-02T01:48:45+5:302017-09-02T01:49:19+5:30
मीरा- भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते.
मीरा रोड : मीरा- भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देतानाच प्रतिष्ठेच्या केलेल्या मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीत ९५ पैकी तब्बल ६१ जागी कमळ फुलले. दरम्यान, नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता कानपिचक्या देत काम कसे करावे हे सांगितले.
भाजपाची एकहाती सत्ता आल्याने अनेकांनी मनमानी, गैरप्रकार व भ्रष्टाचार वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. अडीच वर्ष पालिकेत भाजपाच सत्तेवर असून आमदारही भाजपाचाच आहे. परंतु मनमानी, घोटाळे, गैरप्रकार आदींच्या तक्रारी, आरोपांची संख्याही कमी झालेली नाही. निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आधी जैन मुनी नयपद्मसागर यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले होते. त्या नंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मावळत्या महापौर गीता जैन, आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदींसह वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवरील नागरिकांचा विश्वास तसेच विकास कामांमुळे विजय मिळाल्याचे सांगत पंतप्रधान व पक्षाचे नाव खराब केलेले खपवून घेणार नाही. नागरिकांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. पालिकेत पैसे कमावण्यासाठी नव्हे तर नागरिकांच्या सेवेसाठी निवडले आहे याचे भान ठेवा, अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या.