‘जिल्हा रुग्णालया’चा दर्जा असलेले एकही रुग्णालय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 01:20 AM2021-01-12T01:20:01+5:302021-01-12T01:20:18+5:30
उपजिल्हा रुग्णालयाचे नऊ महिन्यांपूर्वीच इलेक्ट्रिक व फायर ऑडिट
हुसेन मेमन
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या जळित-कांडामुळे महाराष्ट्राचे समाजमन हेलावून टाकल्यानंतर राज्याच्या अन्य जिल्ह्यांतील शिशु केअर सेंटरमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तथापि, सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या नकाशावर आलेल्या नवीन पालघर जिल्ह्यामध्ये अद्यापही ‘जिल्हा रुग्णालया’चा दर्जा असलेले एकही रुग्णालय अस्तित्वात नाही. मात्र जव्हार, डहाणू आणि कासा येथे तीन उपजिल्हा रुग्णालये आहेत.
पालघर हा नवीन जिल्हा सहा वर्षापूर्वी झाला असला तरी एकही जिल्हा रुग्णालय निर्माण करण्यात आलेले नाही. केवळ तीन उपजिल्हा रुग्णालयांत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील एकमेव जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयातील शिशु उपचार केंद्राचे नऊ महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट झाले असून, ते केंद्र सुरक्षित आणि सुसज्ज असल्याचे आरोग्य विभागातील स्थानिक अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात जव्हार, डहाणू आणि कासा ही तीन उपजिल्हा रुग्णालये आहेत. त्यापैकी जव्हारच्या रुग्णालयातच शिशु केअर युनिट कार्यरत आहे.
अग्निशमनविरोधी यंत्रणा सुसज्ज असल्याचा दावा
रुग्णालयात अग्निशमनविरोधी यंत्रणांचे सहा संच असून ते कार्यरत असतात तसेच त्यांची मुदत संपल्यावर त्यांना तातडीने बदलण्यात येतात. आतापर्यंत या रुग्णालयात कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. रुग्णालयातील अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेचे ऑडिट एप्रिल २०२० मध्ये करण्यात आले आहे.
- डॉ. अनिल थोरात,
जिल्हा शल्य चिकित्सक
कासा रुग्णालयाचे ऑडिट नाही
कासा : डहाणूतील उपजिल्हा रुग्णालयाचे अद्याप इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही, मात्र प्रशासनाने तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातील आदिवासी भागातील हे ५० खाटांचे हे रुग्णालय असून त्याचे फायर ऑडिट सप्टेंबर २०२० मध्ये झाले आहे. मात्र १४ वर्षांपूर्वी उभारलेल्या या रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट झाले नाही.
जिल्ह्यात तीन उपजिल्हा रुग्णालये
आदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी तसेच जन्म घेतलेल्या शिशूवर उपचार करण्यासाठी जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येतात. तसेच डहाणूतील उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांची क्षमता असून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची क्षमता आहे.
कुटीर रुग्णालयात ४० इनक्युबेटरची व्यवस्था
पालघर जिल्ह्यातील आणि आदिवासीबहुल दुर्गम भागातील एकमेव असलेल्या जव्हार तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय असलेल्या कुटीर रुग्णालयामध्ये साधारण ४० इनक्युबेटरची व्यवस्था आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे आणि लहान बालके तसेच प्रसूतीसाठी आलेल्या महिलांवर वैद्यकीय उपचार करणारे हे ठिकाण आहे.
- डॉ. रामदास मरांड,
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक
माझी प्रसूती शनिवारी झाली असून माझ्या बाळाचे वजन कमी असल्यामुळे त्याला येथे रुग्णालयातील गरम पेटीत ठेवण्यात आले आहे. या रुग्णालयामधील सुविधा चांगल्या आहेत, असे माझे मत आहे. तसेच रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारीवर्र्देखील चांगली देखभाल करीत आहेत.
- उज्ज्वला रवींद्र चिपाट,
प्रसूती माता,
आकरे (वांगणपाडा), ता. जव्हार