कुर्झे धरणावर ९ महिन्यांपासून वीजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:10 PM2019-11-05T23:10:30+5:302019-11-05T23:10:46+5:30

निधीअभावी कामे रखडली : आपत्कालीन परिस्थितीत दरवाजे उघडायचे कसे?

There is no electricity on Kurze dam for 6 months | कुर्झे धरणावर ९ महिन्यांपासून वीजच नाही

कुर्झे धरणावर ९ महिन्यांपासून वीजच नाही

googlenewsNext

सुरेश काटे

तलासरी : दापचरी दुग्ध प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या कुर्झे धरणाची सुरक्षा सध्या रामभरोसे असून धरणावर सुरक्षा रक्षकांच्या बरोबरच नऊ महिन्यांपासून वीज पुरवठाही नाही. मात्र, वीज पुरवठ्याअभावी आपत्ती काळात धरणाचे दरवाजे उघडायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, ६ ते ८ नोव्हेंबर या काळात चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आपत्काळात कुर्झे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. पण, वीजपुरवठाच नसेल तर हे दरवाजे उघडायचे कसे असा प्रश्न आहे.

नऊ महिन्यापासून या धरणावर वीज पुरवठा बंद आहे. दापचरी दुग्ध प्रकल्पाचा वीज पुरवठा सार्वजनिक बांधकाम खात्याचे वीज विभाग बघते. याचा कारभार कल्याण वरून चालतो. त्यामुळे येथे या विभागाने एक कर्मचारी ठेवला आहे. तरीही तांत्रिक समस्येमुळे नऊ महिन्यांपासून वीज पुरवठा बंद आहे. याबाबत दापचरी बांधकाम विभागाने प्रकल्प अधिकाऱ्यांना तसेच सार्वजनिक बांधकाम वीज विभागाला पत्रव्यवहार केला आहे, पण अद्याप यावर कार्यवाही झालेली नाही.
दापचरी दुग्ध प्रकल्पाचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव पाच वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे दापचरी येथील वीज समस्या दूर करण्यास दुग्ध विकास आयुक्तांकडून निधीच मिळत नाही. दापचारी दुग्ध प्रकल्पाची वीज व्यवस्था डबघाईला आली आहे. गेल्या चाळीस वर्षात धरण परिसरातील वीज तारा, ट्रान्सफार्मर बदलण्यात आलेले नाहीत, त्यामुळे या धरणावर वारंवार वीज पुरवठा बंद पडतो. पण याची दुरुस्ती करण्यासाठी प्रकल्प कार्यालय निधीच देत नाही. निधी अभावी सामग्री खरेदी कशी करायची, अशी विचारणा कल्याण वीज विभागाचे अधिकारी करतात.

पालघर जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आपत्काळात कुर्झे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना केल्या आहेत. पण विजेअभावी दरवाजे उघडायचे कसे, धरणाचे दरवाजे मॅन्युअली उघडण्यास तीन ते चार लागतात. तसेच पाण्याचा जोर जास्त असल्यास दरवाजे मॅन्युअली उघडणे शक्य होत नाही, अशावेळी दरवाजे न उघडल्यास धरणास धोका उद्भवू शकतो.

धरणावर वीज पुरवठा नऊ महिन्यापासून बंद आहे. प्रकल्प कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार केला आहे. सुरक्षा रक्षकाअभावी सामग्री चोरीस जात आहे. तसेच विजेअभावी धरणाचे दरवाजे उघडणे शक्य होत नाही. - कुंदन वाघ, ज्युनिअर अभियंता, बांधकाम विभाग, दापचरी

वीज दुरुस्तीसाठी प्रकल्पाकडून निधीच दिला जात नसल्याने चाळीस वर्षापासूनच्या वीज तारा ट्रान्सफार्मर दुरुस्त कसे करायचे.
- प्रशांत धोडे, उपअभियंता,
वीज विभाग, कल्याण.

धरणावरील वीजपुरवठा सुरू करण्याबाबत वीज विभागाला कळविले आहे. परंतु दुग्ध विभाग आयुक्त वरळी, यांच्याकडून निधी उपलब्ध होत नाही. - एस.सी. चौधरी, सहा. प्रकल्प अधिकारी, दापचरी

Web Title: There is no electricity on Kurze dam for 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.