वाफे केंद्रात ऑक्सिजन सिलिंडर भरण्याची सोय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:07 PM2021-04-25T23:07:56+5:302021-04-25T23:08:04+5:30
जनार्दन भेरे भातसानगर : वाफे येथील सेंटरमध्ये शेवटच्या रुग्णापर्यंत ऑक्सिजन मिळतो का हे पाहणे औत्सुुक्याचे ठरेल कारण केवळ या ...
जनार्दन भेरे
भातसानगर : वाफे येथील सेंटरमध्ये शेवटच्या रुग्णापर्यंत ऑक्सिजन मिळतो का हे पाहणे औत्सुुक्याचे ठरेल कारण केवळ या ठिकाणी केवळ प्राथमिक उपचार केले जातात. दररोज चार ते पाच रुग्ण हे अत्यवस्थ झाल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी कुठे घेऊन जायचे असा प्रश्न पडतो. अशा अवस्थेतील रुग्णांना कुठेही ऑक्सिजन बेड मिळत नाहीत ना रेमडेसिविर. यामुळेच अनेकांचा जीव गेला आहे. या सेंटरमध्ये १६० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. या ठिकाणी ऑक्सिजनची नितांत गरज आहे, मात्र केवळ येथे ऑक्सिजनचे बाटले दिसत असून केवळ दोन ते तीनच भरलेले असतात. ते भरण्याची येथे कोणतीही व्यवस्था नाहीत.
उपजिल्हा रुग्णालयात सध्या टाकी बांधण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये अजूनही साठवण नसल्याने जे आहे त्यामध्ये रुग्णांना वाचविण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हा खर्च करायचा कुणी असाही प्रश्न असल्याचे प्रशासनाकडून समजते. उपजिल्हा रुग्णालय येथे आता नव्याने मोठी टाकी बांधण्यात आली आहे.
नाशिकमध्ये जी वायूगळती झाली यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागला, अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शहापूर तालुक्यामध्ये दक्षता घेतली जात असली तरीही प्राणवायू सिलिंडरमध्ये टाकण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या ठिकाणी असा कुणीही प्रशिक्षित व्यक्ती नसल्याने अशा प्रकारचा बाका प्रसंग ओढवू शकतो. उद्या जर एखाद्या रूममध्ये अशा प्रकारची सिलिंडरची टाकीची गळती झाली, वीज वाहिन्यांनी पेट घेतला तर ते विझविण्यासाठी येथे अग्निशमन यंत्रणा तालुक्यातच नाही तर येथे कशी असेल. लहान बंब असेल तरी ते सुरू करण्याची माहिती तरी हवी.
पहिल्या लाटेमध्ये सेंटरची स्थापना केली तेथे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. नव्याने सुरू केलेले हे केवळ कोविड केअर सेंटर आहे. त्यामुळे येथे ऑक्सिजन बेड वगैरे शक्यच नाही. त्यामुळे येथे अत्यवस्थ रुग्ण बरा होईलच कसा? सध्या तालुक्यात मृतांची संख्या अधिक आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये असणाऱ्या बहुतांश ऑक्सिजनच्या नळकांड्या सेंटरला पुरवण्यात आलेल्या आहेत.