सोहळ्यास मैदान नाहीच, वसई-विरार महापालिकेचा आडमुठेपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:06 AM2017-11-23T03:06:33+5:302017-11-23T03:06:46+5:30
वसई : शासकीय कार्यक्रम असतानांही संविधान दिन सोहळ्याबाबत वसई विरार महापालिका उदासीन आहे.
शशी करपे
वसई : शासकीय कार्यक्रम असतानांही संविधान दिन सोहळ्याबाबत वसई विरार महापालिका उदासीन आहे. गेल्या वर्षीही संविधान दिन सोहळ्यास मैदान नाकारणा-या महापालिकेने यंदाही तोच कित्ता गिरवला आहे. हे मैदान खेळासाठी राखीव असल्याने ते या सोहळ्यासाठी देता येत नाही, असे कारण देण्यात आले आहे.
दर २६ नोव्हेंबरला शासनातर्फे संविधान दिन सरकारी कार्यालयांमध्ये साजरा करण्यात येतो. मात्र, या दिनाचे कार्यक्रम घेण्यात वसई विरार महापालिका उदासिन असते. त्यामुळे वसईतील सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन संविधान दिन गौरव समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून गेल्यावर्षापासून नालासोपारा येथे संविधान दिन साजरा करण्यास सुुरुवात केली आहे. पण, पहिल्याच वर्षी महापालिकेने त्यात खोडा घातला होता. सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आला असतांना महापालिकेने कार्यक्रमासाठी शूर्पारक मैदान नाकारले होते. याविरोधात आयोजकांनी न्यायालयात दाद मागितली होती. तेंव्हा अगदी शेवटच्या क्षणी मैदान देण्यात आले होते.
महापालिकेने मैदान दिले नाही तरी नालासोपाºयातील श्रीप्रस्थ मैदानात हा कार्यक्रम केला जाणार आहे.
महापालिकेने संविधान दिनानिमित्त प्रत्येक प्रभाग समिती, शाळांमध्ये कार्यक्रम केले पाहिजेत. पण, स्वत: कार्यक्रम करायचा नाही आणि इतरांकडून होणाºया कार्यक्रमात महापालिका अडथळे आणत आहेत. असा आरोप संविधान गौरव समितीचे अध्यक्ष महेश राऊत यांनी केला आहे. ज्या संविधानावर महापालिकेचा कारभार चालतो, तो संविधान दिन महापालिका साजरा करीत नाही ही शोकांतिका आहे. इतर कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणारी महापालिका या कार्यक्रमासाठी निधी सोडा, साधे मैदानही देत नाही. उलट अडवणूक करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेच्या कार्यालयात दरवर्षी संविधान दिन साजरा केला जातो, असे उपायुक्त अजीज शेख यांचे म्हणणे आहे.
ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, आॅल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मोहम्मद उमरैन महफुज रेहमानी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ओबीसी सत्यशोधक समितीचे राज्य संघटक उल्हास राठोड यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आता या संघर्षानंतर महापालिकेला आपला निर्णय बदलण्याची सद्बुद्धी सुचते आहे काय? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
>महापौरांच्या वाढदिवसाचा बार मात्र जोरात
संविधान दिन कार्यालयापुरताच साजरा करणाºया महापालिकेने यंदा २६ नोव्हेंबरला महापौर प्रविणा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वसई विरार परिसरात अनेक कार्यक्रमाचा बार उडवून देण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.
यादिवशी मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन, पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन यासह अनेक नागरी सुविधांची उद्घाटने होणार आहेत.