पालघरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालयच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:10 AM2020-09-27T00:10:51+5:302020-09-27T00:11:08+5:30
जिल्हा निर्मितीला सहा वर्षे उलटूनही प्रतीक्षा । नागरिकांच्या आरोग्याशी भेसळमाफियांचा खेळ
मंगेश कारळे ।
नालासोपरा : पालघर जिल्हा अस्तित्वात येऊ न सहा वर्षे उलटली तरी जिल्ह्यात अद्याप अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालयच नाही. ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त कारभार देऊन वेळ काढला जातो. मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे भेसळमाफियांचे फावले आहे.
वसई तालुक्यात भेसळमाफियांची राजधानी बनत चालली आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नसल्याने भेसळमाफिया मोकाट झाले आहेत. पाणी, खवा, चीज, मावा, मिठाई, पनीर, बेकरी प्रॉडक्टमध्ये भेसळ करून नागरिकांना स्लो पॉयझन दिले जात आहे. अनियंत्रित नालासोपारा शहरात अनेक बेकायदा धंदे चालत असतात. या धंद्यांमध्ये भेसळमाफियांची भर पडली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी छोट्या चाळींत, गोदामांत भेसळयुक्त पदार्थ तयार केले जातात. त्यात नकली माव्यापासून मिठाई बनवली जाते. शिवाय, पनीर, तेल, बेकरी प्रॉडक्ट बनवले जातात. मोठ्या हॉटेलमध्ये वापरलेले तेल आणून विविध पदार्थ बनवले जातात. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून अद्याप जिल्ह्याला स्वतंत्र अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय मिळालेले नाही. २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची स्थापना झाली. तेव्हा खरे तर जिल्ह्याला स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन कार्यालय मिळणे गरजेचे होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी एकच कार्यालय आहे. ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे पालघर जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असून त्यांच्याकडे मनुष्यबळ नसल्याने शहरात लक्ष ठेवणे कठीण जाते. पोलिसांकडे तक्र ार केल्यावर पोलीस केवळ छापे टाकतात. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घेतल्याशिवाय त्यांना कारवाई करता येत नसल्याने भेसळमाफियांचे फावते आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळमाफिया सक्रिय झाले आहेत. सध्या वसई तालुक्यात दोन प्रकारचे मावे विकले जात आहेत. एक वैधता संपलेला आणि दुसरा सिंथेटिक मावा. त्यांची आवरणे बदलून विक्र ी होत आहे. घाऊक व्यापारी हा मावा ९० ते १२० रु पये किलोने विकत घेतात तर किरकोळ व्यापारी २५० ते ४०० रु पये किलोने विकत घेतात. तर सामान्य ग्राहकाला याच माव्यापासून बनवलेली व मिठाई आणि अन्य स्वरूपात ३५० ते ८०० रु पये किलोने विकतात. हा बनावटी मावा राजस्थान, गुजरात राज्यातून आणला जातो. मावा आणण्यासाठी चक्क प्रवासी बसचा वापर करून नंतर तो साखळी पद्धतीने वितरित
केला जातो.
मावा साठवण्यासाठी आणि विक्र ीसाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवानगी आवश्यक असते. तसेच माव्याची साठवणूक ठराविक तापमानात करावी लागते. कारण तीन दिवसांत हा मावा खराब होतो. भेसळ करणारे हा मावा अडगळीच्या ठिकाणी गोदामात ठेवतात. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत कोटींचा हा गोरखधंदा राजरोस सुरू आहे.
टाळेबंदीमुळे काम लांबणीवर
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांसाठी जागा देण्यात आली. आॅगस्टमध्ये उद्घाटन होऊन कार्यालय सुरू होणार होते. मात्र, टाळेबंदीमुळे ते लांबणीवर गेले आहे. आता हे कार्यालय जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभाग तयार केल्याशिवाय भेसळमाफियांवर अंकुश लावता येणार नाही.
पालघर जिल्ह्यात अन्न व औषध विभागाचे कार्यालय व्हावे, यासाठी अनेक पत्रव्यवहार करून प्रयत्न केले. प्रयत्नामुळे कार्यालयासाठी मान्यताही मिळाली. कार्यालयाला जागा नसल्यामुळे अद्याप सुरू झालेले नाही. आॅगस्टमध्ये सुरू होणार होते, पण ते झालेले नाही. तरीही हे कार्यालय लवकरच सुरू होईल.
- राजेंद्र गावित, खासदार, पालघर जिल्हा