बोईसर आगारात निवारा शेडच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:08 AM2020-02-23T01:08:27+5:302020-02-23T01:08:31+5:30
उन्हात बसून करावी लागते प्रतीक्षा; एस.टी. प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप
बोईसर : बोईसरहून पालघरला जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बोईसर एस.टी. आगारात बसची प्रतीक्षा उन्हातच करावी लागते आहे. येथे निवारा शेड असावी, या प्रवाशांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे एस.टी. प्रशासन गांभीर्याने पहात नसल्याने उन्हाळा तसेच पावसाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
बोईसर - पालघर दरम्यान दररोज अर्ध्या तासाच्या अंतराने चाळीस - चाळीस अशा बसेसच्या एकूण ८० फेºया होतात. यातून सुमारे तीन हजार प्रवासी ये-जा करीत असतात. बोईसर एस.टी. डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालघरकडे जाण्यासाठी बसेस थांबतात. परंतु तेथे निवारा शेड नसल्याने प्रवाशांना कधी उन्हात, कधी पावसात थांबावे लागते.
पालघर हे तालुका आणि जिल्ह्याचे ठिकाण असल्याने इतर कामाबरोबरच शासकीय कामासाठी बोईसरच्या नागरिकांना ये-जा करावी लागते. अशा महत्त्वाच्या थांब्यावर ऊन - पावसापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांना निवाºयाची अत्यंत गरज आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे निवारा नसलेल्या या थांब्यापासून अगदी काही अंतरावर शेकडो प्रवासी तसेच नागरिक उघड्यावरच लघुशंका करीत असल्याने काहीवेळा दुर्गंधीलाही तोंड द्यावे लागते. अशा दुहेरी समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागते आहे. एस.टी.महामंडळाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन, प्रवाशांच्या सेवेसाठी नागरिकांना वाहतूक सुविधा पुरवली आहे. त्यामधे बसस्थानकावर प्रवाशांसाठी प्रतीक्षालय अपेक्षित आहे. तेथे प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, खेळती हवा रहावी यासाठी पंखे, पिण्याचे पाणी या सुविधा त्याशिवाय प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करणे सुलभ व्हावे याकरिता स्वतंत्र फलाटाचीही व्यवस्था अनेक आगारात दिसते. परंतु बोईसर एस.टी. आगार उत्पन्नाच्या दृष्टीने मोठे असूनही येथे अशी दुरवस्था दिसत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
राज्य परिवहन पालघर विभागीय स्थापत्य अधिकाऱ्यांना निवारा संदर्भात पत्र पाठवण्यात येईल.
- संदीप शिंदे, आगार व्यवस्थापक