रोहयोची मजुरी नाहीच; केवनाळे आदिवासींची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:35 AM2019-12-13T00:35:56+5:302019-12-13T00:37:24+5:30
सीईओ म्हणतात पाहतो
- रवींद्र साळवे
मोखाडा : दीड वर्षांचा कालावधी उलटूनही केवनाळेतील आदिवासींना रोहयोची मजुरी अद्याप मिळालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे पंचायतीचे उंबरठे झिजवूनही आदिवासींना हक्काचा मोबदला मिळालेला नाही. ही बाब गंभीर असून याबाबत पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांना विचारले असता त्यांनी आपण यात लक्ष घालू, असे सांगितले.
‘मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम’, या धोरणाचा या प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते आहे. सूर्यमाळ ग्रामपंचायतमधील केवनाळे येथील ५० ते ६० आदिवासी मजुरांनी मे २०१८ मध्ये १५ दिवस रस्त्याचे काम केले आहे. परंतु तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटत आला तरी या मजुरांना त्यांच्या हक्काचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. ग्रामसेवकाने हलगर्जीपणामुळे वेळेत देयके सादर न केल्याने त्यांना त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित रहावे लागत आहे.
स्थायी समितीत प्रश्न : कार्यवाहीची मागणी
याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी देखील स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न मांडून कार्यवाहीची मागणी केली आहे. पण, अजूनही या आदिवासींना त्यांची मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.