गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा धड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:48 PM2019-06-17T22:48:50+5:302019-06-17T22:48:58+5:30
व्हॉल्व्हमन करतात मनमानी; त्रास जनतेला
नालासोपारा : शहरात मागील ३ ते ४ दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्यामुळे हाल हाल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी साठा वसई विरार शहरात कमी दाबाने आणि थोड्या प्रमाणात पुरवला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाला पाणी पुरत नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही ठिकाणी अवाच्यांसव्वा पैसे देवून टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. महानगरपालिका क्षेत्रात घरपट १२० रु पये महिन्याला बिल दिले जाते. पाणी मिळो की न मिळो हे बिल महानगरपालिकेला भरावे लागते. हे बिल भरूनसुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. जेवढे दिवस पाणी मनपा देते तेवढेच बिल आकारावे, अशी लोकांत चर्चा आता जोर धरु लागली आहे.
वसई तालुक्यात वाढती लोखसंख्या लक्षात घेता मनपाने सर्वच ठिकाणी सर्वे करून पाणी पुरवठा सुरळीत किंवा पाईप लाईन लागतील तर टाकल्या पाहिजेत अन्यथा उद्या पाण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.मनपा कमी पाणीपुरवठा करून या समस्येकडे जाणिवपूर्वक लक्ष देत नसून त्यामुळे बाटलीतील पाणी आणून ते प्यावे लागते आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे.
व्हॉल्व्हमन पैसे कमावतात
प्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी मनपाने व्हॉल्व्हमन ठेवले आहे. काही व्हॉल्व्हमन इमारतीकडून पैसे घेऊन जास्त पाणी सोडत आहे तर जी इमारत पैसे देत नाही त्यांना कमी पाणी सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर व्हॉल्व्हमन हे व्हॉल्व्हचे कमी आटे खोलत असल्यामुळे काही प्रभागात पाणी पुरवठा कमी दाबाने व अनियमित होत असल्याच्या अनेक तक्र ारी नगरसेवकांकडे रोज केल्या जात आहेत.