गुन्ह्यात जप्त झालेली २०० वाहने झाली खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:22 PM2019-01-18T23:22:28+5:302019-01-18T23:22:36+5:30
कण्हेर पोलीस चौकी परिसरातील दुर्घटना : बोली लावायला कुणी आलेच नव्हते
वसई : विरार मधील पोलीस चौकीत लागलेल्या आगीत २०० दुचाकी जळून खाक झाल्या. गुरूवारी दुपारी विरार पूर्वेच्या कणेर चौकीत ही दुर्घटना घडली. ट्रान्सफॉर्मरमधील आॅईलच्या गळतीने झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे पोलिसांनी सागितले.
विरार पूर्व महामार्गालगत असलेल्या कण्हेर पोलीस चौकीच्या मागे पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी ठेवल्या होत्या. गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चौकीच्या मागे असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधील आॅईलच्या गळतीमुळे या ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. यामुळे जप्त केलेल्या दुचाकींना आग लागली. त्यानंतर तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्याने २ गाड्याच्या साहाय्याने आग विझविली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच ही वाहने पोलिसानी वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेली होती. पोलीस स्थानकात जागा नसल्याने ती कणेर पोलीस चौकीच्या मागे उभी करण्यात आलेली होती.
२००हून अधिक वाहने आगीत जळून राख झाल्याची माहिती अग्निशमन जवानांनी दिली.
लिलाव ढकलला होता पुढे
या दुचाकी विविध गुन्ह्यात वापरलेल्या असून त्यांचा लिलाव करण्यासाठी त्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. याच महिन्यात या वाहनांची लिलाव प्रकिया पूर्ण झाली होती. परंतु त्यांची बोली लावण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने हे लिलाव पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती विरार पोलिसांनी
दिली.