‘ते’ बेपत्ता कुटुंबीय उज्जैनमध्ये, कर्जबाजारी झाल्याने भूमीगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:18 AM2018-03-24T03:18:50+5:302018-03-24T03:18:50+5:30
- शशी करपे
वसई : सहा महिन्यांपूर्वी विरार शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या शर्मा कुटुंबातील पाच व्यक्तींना पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेशातील उज्जैन येथून शोेधून काढले. तर एकाला पुण्यातून शोधण्यात आले. कर्जबाजारी झाल्याने कुटुंबातील सहाही जण भूमीगत झाल्याचे तपासात उजेडात आले आहे.
विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील वरुण सतीशचंद्र शर्मा, अनिता सतिशचंद्र शर्मा, अश्विनी सतीशचंद्र शर्मा, सुरेंद्रकुमार रामचंद्र शर्मा, मालती सुरेंद्रकुमार शर्मा, प्रियंका सुरेंद्रकुमार शर्मा आपल्या राहत्या घरातून १५ आॅक्टोबर २०१७ रोजी बेपत्ता झाले होते. वरुण शर्मा यांची अमरावती येथे राहणारी पत्नी संगीत हिने २२ आॅक्टोबरला अमरावतीहून बेपत्ता झाल्याची आॅनलाईन तक्रार दिल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सहा जण बेपत्ता झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सून संगिता हिच्या आॅनलाईन तक्रारीवरून अर्नाळा सागरी पोलीस वरुण शर्माच्या घरी गेले असता घराला कुलुप होतो. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये १५ आॅक्टोबरला पहाटे सहा जण एका कारमध्ये सामान टाकून निघून गेल्याचे दिसले होते.
याप्रकरणाचा तपास पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, मंगेश चव्हाण, माया भोर, प्रशांत पाटील या पथकाकडे सोपवण्यात आला होता. वरुणने एकदा फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून पत्नी संगिताशी संपर्क साधला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुगलवरून वरुणचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला पुणे येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर वरुणच्या मदतीने उज्जैन मधून ताब्यात घेतले. सुरेंद्रकुमार शर्मा यांनी विरार येथील पाच ते सहा जणांकडून सहा लाख रुपये घेतले होते. मात्र, त्या कर्जाची परतफेड न केल्याने पैसे देणाऱ्यांनी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अडचणीत सापडलेल्या शर्मा कुटुंबियांनी म्हणूनच विरार सोडून उज्जैन येथे पळ काढला होता.
सुनेने केली तक्रार
अमरावती येथे राहणारी संगिता बाळंतपणासाठी जून २०१७ रोजी आपल्या माहेरी गेली होती. तिने मुलाला जन्म दिल्यानंतर वरुण एकदा तिला भेटायलाही गेला होता. मात्र, आॅक्टोबर २०१७ पासून कुटुंबातील कुणाचाही संपर्क होत नसल्याने तिने आॅनलाईन तक्रार केली होती.